“उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची माफी मागा”; सुप्रीम कोर्टाने राघव चड्ढा यांना चांगले सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 13:13 IST2023-11-03T13:12:46+5:302023-11-03T13:13:56+5:30
Supreme Court Slams Raghav Chadha: राघव चड्ढा यांनी उपराष्ट्रपतींची बिनशर्त माफी मागावी, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केली आहे.

“उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची माफी मागा”; सुप्रीम कोर्टाने राघव चड्ढा यांना चांगले सुनावले
Supreme Court Slams Raghav Chadha: आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा यांना सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी राघव चड्ढा यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची बिनशर्त माफी मागावी, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे.
ऑगस्टमध्ये राज्यसभा अध्यक्षांनी राघव चड्ढा यांना निलंबित केले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राघव चड्ढा यांना माफी मागण्यात सांगण्यात आले आहे. राघव चड्ढा प्रथमच खासदार झाले असून, राज्यसभेचे तरुण सदस्य आहेत. त्यांच्या माफीचा सभापती गांभीर्याने विचार करतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनेवर अॅटर्नी जनरल म्हणाले की, हे प्रकरण सभागृहाचे असल्याने चढ्ढा यांना राज्यसभेतच माफी मागावी लागेल. यावर, आम्हाला वाटते की हे प्रकरण सामंजस्याने सोडवले जाईल, असे सर्वोच्च न्यायालायने सांगितले.
पुढील सुनावणी दिवाळीच्या सुटीनंतर घेण्यात येणार
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, राघव चड्ढा अध्यक्षांसमोर हजर राहू शकतात आणि बिनशर्त माफी मागू शकतात. याचिकाकर्त्याचा सभागृहाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे मानले जात आहे. अध्यक्षांना भेटण्यासाठी राघव चड्ढा यांनी वेळ मागून घ्यावी आणि माफी मागावी, असे स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी दिवाळीच्या सुटीनंतर घेण्यात येणार आहे.