“आरडाओरड करू नका, अन्यथा कोर्टाबाहेर काढेन”; CJI चंद्रचूड वकिलांवर चांगलेच संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 09:47 AM2024-01-04T09:47:20+5:302024-01-04T09:48:00+5:30

Supreme Court CJI DY Chandrachud News: याचिकेवरील चर्चेदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका वकिलांना चांगलेच खडेबोल सुनावले.

supreme court cji dy chandrachud slams advocate in courtroom | “आरडाओरड करू नका, अन्यथा कोर्टाबाहेर काढेन”; CJI चंद्रचूड वकिलांवर चांगलेच संतापले

“आरडाओरड करू नका, अन्यथा कोर्टाबाहेर काढेन”; CJI चंद्रचूड वकिलांवर चांगलेच संतापले

Supreme Court CJI DY Chandrachud News:सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. न्यायालयात घडत असलेल्या घटनांवर चंद्रचूड यांचे बारीक लक्ष असते. नियमांचे उल्लंघन किंवा चुकीची वर्तणूक केली जात असेल, तर तिथल्या तिथे न्या. चंद्रचूड स्पष्ट शब्दांत समज देतात. वकिलांनाही अनेकदा खडसावले आहे. पुन्हा एकदा तसाच एक प्रसंग न्यायालयात घडल्याचे सांगितले जात आहे. वकिलांच्या वर्तणुकीवर नाराज झालेल्या न्या. चंद्रचूड यांनी भर न्यायालयात वकिलांना खडेबोल सुनावले.

मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी एका वकिलाला मोठ्या आवाजात बोलण्यावरुन चांगलेच फटकारले. वकील ओरडून बोलत होते. हावभाव आणि चढा आवाज यावर सरन्यायाधीश संतापले. न्यायालयात एका याचिकेवर चर्चा सुरू होती. यावेळी न्या. चंद्रचूड यांनी वकिलाला रोखले आणि शांतपणे बोलण्यास सांगितले. जे काही म्हणणे मांडायचे आहे ते ओरडून आणि तावातावाने मांडू नका, तुमचा आवाज कमी ठेवा. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहात. तावातावाने बोलणे थांबवले नाहीत तर न्यायालयातून बाहेर काढले जाईल, या शब्दांत न्या. चंद्रचूड यांनी सुनावले.

२३ वर्षांच्या करिअरमध्ये असे घडले नाही

न्या. चंद्रचूड यांनी वकिलाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. तसेच तुम्ही कुठे असता? प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने न्यायाधीशांवर ओरडता का? न्यायालयात बोलताना चांगल्या पद्धतीने बोलले पाहिजे. ओरडून, तावातावाने बोलून काय होणार? आवाज कमी करा. आवाज चढवल्याने माझ्यावर प्रभाव पाडू शकता, असे तुम्हाला वाटत असेल, तर ती तुमची चूक आहे. करिअरच्या २३ वर्षांमध्ये असे कधी घडले नाही आणि कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षातही असे मुळीच होणार नाही, असा स्पष्ट इशारा न्या. चंद्रचूड यांनी दिला. 

दरम्यान, न्या. चंद्रचूड संतप्त झाल्याचे पाहून वकिलांनी नरमाईने घेतले. तातडीने माफी मागितली आणि सौम्य आवाजात बोलण्यास सुरुवात केली. याचिकेवरील चर्चा पुढे सुरू राहिली, असे सांगितले जात आहे.
 

Web Title: supreme court cji dy chandrachud slams advocate in courtroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.