Supreme Court Crisis : मोठ्या मुद्यांसाठी सरन्यायाधीशांनी स्थापन केलं घटनात्मक खंडपीठ, त्या 4 ज्येष्ठ न्यायाधीशांचा समावेश नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 08:28 AM2018-01-16T08:28:44+5:302018-01-16T10:54:59+5:30
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा व चार ज्येष्ठ न्यायाधीश यांच्यातील वादळ आता शमले असल्याचा दावा सोमवारी (15 जानेवारी) करण्यात आला.
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा व चार ज्येष्ठ न्यायाधीश यांच्यातील वादळ आता शमले असल्याचा दावा सोमवारी (15 जानेवारी) करण्यात आला. यानंतर सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण प्रकरणांच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांचं एक घटनात्मक खंडपीठ स्थापन केले आहे. विशेष म्हणजे या खंडपीठात पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यशैलीवर उघड टीका करणा-या चार न्यायाधीशांपैकी एकाही न्यायाधीशाचा समावेश करण्यात आलेला नाही.
न्यायाधीश जे चेलमेश्वर, न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश मदन बी. लोकूर व न्यायाधीश कुरियन जोसेफ हे ‘बंडखोरी’ करणा-या चार न्यायाधीशांपैकी एकाही न्यायाधीशाच्या नावाचा या घटनात्मक खंडपीठात समावेश करण्यात आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए.के. सीकरी, न्यायाधीश ए.एम. खानविलकर, न्यायाधीश डी.वाई.चंद्रचूड आणिन्यायाधीश अशोक भूषण यांचा समावेश आहे. हे खंडपीठ 17 जानेवारीपासून अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी सुरू करणार आहे.
CJI Dipak Misra has set up a 5-judge constitution bench under him to hear several major cases, the bench doesn't include the four judges who had held a press conference. (file pic) #SupremeCourtpic.twitter.com/mTkSISHuMC
— ANI (@ANI) January 16, 2018
सुप्रीम कोर्टातील ‘वादळ’ पूर्णपणे शमल्याचा दावा!
चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारी (12 जानेवारी) सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या कार्यशैलीवर उघड टीका केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश आपापल्या न्यायालयांमध्ये रुजू झाले. त्यांनी नेमून दिलेल्या प्रकरणांवर सुनावणी घेतली. यावरून न्यायालयातील वादळ आता शमले असल्याचा दावा सोमवारी करण्यात आला. न्या. जस्ती चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन बी. लोकूर व न्या. कुरियन जोसेफ हे ‘बंडखोरी’ करणारे चार न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश न्या. मिस्रा यांच्यापैकी कोणीही ‘आमच्यातील वाद संपले’ असे सांगितले नाही. मात्र वकील मंडळींना वातावरण ‘आलबेल’ असल्याचे जाणवले.
खरेतर चार न्यायाधीशांनी, कामाचे वाटप करताना सरन्यायाधीश पक्षपात करतात, ज्येष्ठांना बाजूला ठेवून महत्त्वाचे प्रकरण कनिष्ठ न्यायाधीशांकडे देतात, असा आरोप केला होता. मात्र नेमून दिलेले काम आम्ही करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलाच नव्हता. किंबहुना सोमवारपासून आम्ही पुन्हा नेहमीच्या कामाला लागू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. ज्या दिवशी वाद चव्हाट्यावर आला, त्या दिवशीही न्यायालय ठप्प झाले नव्हते. न्यायाधीशांनी नेहमीपेक्षा भरभर काम उरकले होते, एवढेच.
बार कौन्सिल आॅफ इंडियाने अनाहूत शिष्टाई करण्याचे ठरविले. कौन्सिलच्या एका शिष्टमंडळाने रविवारच्या सुटीच्या दिवशी सरन्यायाधीशांसह जे न्यायाधीश भेटू शकले त्यांची भेट घेतली आणि वाद चव्हाट्यावर आणू नका, अशी विनंती केली. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंग यांनीही समांतर शिष्टाई केली.
चहाच्या कपातील वादळ शमले : अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांना एका वृत्तवाहिनीने विचारले असता त्यांनीही, सर्व न्यायालये सुरळीत सुरू असल्याचा उल्लेख करत ‘जे झाले होते ते चहाच्या कपातील वादळ होते व आता ते शमले आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली.
सर्व न्यायालये सुरळीतपणे सुरू असल्याचे तुम्ही पाहतच आहात. त्यामुळे जो काही वाद होता त्याला मूठमाती मिळाली आहे, असे बार कौन्सिलचे अध्यक्ष मन्नन कुमार मिश्रा यांनी सांगितले. वाद लवकरच मिटेल, असे सरन्यायाधीश रविवारच्या भेटीत म्हणाले होते, याचे स्मरण देऊन, जणूकाही आपल्या मध्यस्थीनेच सर्वकाही सुरळीत झाले, असे भासविण्याचा प्रयत्न मिश्रा यांनी केला.