Supreme Court: पुन्हा तारीख! शिंदे-शिवसेना वादातील 'सर्वोच्च' सुनावणी 10 दिवस लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 05:42 PM2022-08-10T17:42:44+5:302022-08-10T17:53:48+5:30
Supreme Court: शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे आता, न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन सव्वा महिना लोटल्यानंतर अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी पार पडला. त्यामुळे, आता सर्वांचेच लक्ष १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यालयातील सुनावणीकडे लागले होते. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा तब्बल १० दिवस पुढे ढकलली आहे. विशेष म्हणजे आजच शिवसेनेनं मुखपत्रातून शिंदे सरकावर टिका करताना मंत्रिमंडळ विस्तार ही लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलं आहे.
शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे आता, न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, या सत्ता संघर्षाचा पेच सुटत नसल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार होती. ती आता १२ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून ती आता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे, सध्याच्या मंत्र्यांना आणि भाजपला काहीसा दिलासा मिळाला आहे, असेच म्हणता येईल.
सरन्यायाधीश रमण्णा हे २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्याजागी उदय लळित हे सरन्यायधीशपदाची जबाबदारी स्विकारत आहेत. त्यामुळे, आता शिंदे विरुद्ध शिवसेना यांच्यातील न्यायालयीन लढाई रमण्णा यांच्या कोर्टात संपुष्टात येते की लळित यांच्यापर्यंत पोहोचते हे पाहावे लागेल.