'लव्ह जिहाद' लग्नाचा तपास करा, सर्वोच्च न्यायालयाचा NIA ला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 02:31 PM2017-08-16T14:31:11+5:302017-08-16T14:32:47+5:30
'लव्ह जिहाद' असल्याचं सांगत केरळ उच्च न्यायालयाने रद्द केलेल्या मुस्लिम व्यक्तीच्या लग्नाची चौकशी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे
नवी दिल्ली, दि. 16 - 'लव्ह जिहाद' असल्याचं सांगत केरळ उच्च न्यायालयाने रद्द केलेल्या मुस्लिम व्यक्तीच्या लग्नाची चौकशी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) हा आदेश दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने मुस्लिम व्यक्तीच्या लग्नाला 'लव्ह जिहाद' संबोधित करत रद्द केलं होतं. यानंतर या व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने एनआयएला तपासाचा आदेश दिला आहे. विेशेष म्हणजे हा तपास सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश आर वी रविंद्रन यांच्या देखरेखेखाली होणार आहे.
तपास पुर्ण होण्याआधी आपला रिपोर्ट न्यायालयात सोपवण्यात यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला दिला आहे. मुख्य न्यायाधीश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितलं आहे की, 'एनआयएचा तपास अहवाल, केरळ पोलिसांची माहिती आणि महिलेशी बातचीत केल्यानंतरच आपण आपला निर्णय सुनावणार आहोत'. सर्वोच्च न्यायालयाने केरळ पोलिसांना प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं एनआयएसोबत शेअर करण्याचा आदेश 10 ऑगस्ट रोजी दिला होता.
अंतिम निर्णय देण्याआधी याचिकाकर्त्याची पत्नी न्यायालयात हजर होणं गरजेचं असल्याचं मुख्य न्यायाधीश जे एस खेहर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितलं आहे. महिलेची बाजू ऐकल्यानंतरच अंतिम निर्णय देणं योग्य असेल असं न्यायालयाने याचिकाकर्ता शफिन जहा यांचे वकिल कपिल सिब्बल यांना सांगितलं. हे प्रकरण आंतरधर्मीय असल्याने योग्य काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत ज्येष्ठ वकिल इंदिरा जयसिंह यांनी खंडपीठासमोर व्यक्त केलं आहे.
केरळमध्ये राहणारे शफिन जहा यांनी आपलं लग्न रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उच्च न्यायालयाने शफिन जहा यांचं लग्न रद्द करत, राज्य पोलिसांना अशा प्रकरणांची चौकशी करण्याचा आदेश दिला होता.
शफिन जहा यांनी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात एका हिंदू महिलेसोबत लग्न केलं होतं. लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने इस्लाम धर्म स्विकारला होता. उच्च न्यायालयाकडून लग्न रद्द करण्यात आल्यानंतर हा देशभरातील महिलांच्या स्वातंत्र्याचा अपमान असल्याचं सांगत शफिन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सीरियामध्ये जाऊन इसीसमध्ये भरती होण्यासाठी महिलेशी लग्न करण्यात आलं होतं असा आरोप करण्यात आला होता. मुलीचे वडिल अशोकन यांनी हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप केला होता.