तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 02:11 PM2024-10-04T14:11:17+5:302024-10-04T14:14:02+5:30

Supreme Court Direction On Tirupati Laddu Controversy: राज्य सरकारच्या एसआयटीने तपास थांबवल्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र एसआयटी तिरुपती मंदिरातील लाडू भेसळ प्रकरणाचा तपास करेल, असे निर्देश दिले.

supreme court directs now new sit team to investigate tirupati laddu controversy | तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश

तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश

Supreme Court Direction On Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती वेंकटेश्वर बालाजी मंदिरात लाडू प्रसादाच्या वादावरून अलीकडील काळात राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू भेसळीचा तपास केला जाईल, असे महत्त्वाचे निर्देश दिले.   

तिरुपती मंदिरातील लाडू भेसळ प्रकरणातील राज्य सरकारकडून केला जात असलेला एसआयटी तपास तात्पुरता स्थगित करण्यात आला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे तपास पुढे ढकरण्यात आला आहे, असे आंध्र प्रदेशचे डीजीपी द्वारका तिरुमला राव यांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी नऊ सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. परंतु, आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवे निर्देश देत स्वतंत्र विशेष तपास पथक तिरुपती मंदिरातील लाडू भेसळ प्रकरणाचा तपास करेल, असे स्पष्ट केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत काय घडले?

न्यायालयाला राजकीय लढाईचा आखाडा बनू देऊ इच्छित नाही. नवीन विशेष तपास पथकात दोन CBI अधिकारी, आंध्र प्रदेश सरकारचे दोन प्रतिनिधी आणि FSSAI च्या एका सदस्याचा समावेश असेल. सीबीआय संचालक एसआयटीच्या तपासावर लक्ष ठेवतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एसआयटी क्षमतेबद्दल शंका नाही. तपासाची देखरेख केंद्रीय पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवावी, अशी आमची मागणी आहे. या प्रकरणात काही तथ्य असेल तर ते तसेच सोडून देणे चुकीचे आहे. देशभरात भक्त आहेत. अन्नसुरक्षाही महत्त्वाची आहे. एसआयटी सदस्यांकडून तपास करण्यात येत असल्याबद्दल कोणताही आक्षेप नाही, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी केला. 

दरम्यान, याचिकाकर्त्याच्या वतीने कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की, या संदर्भात पुन्हा निवेदन देण्यात आले आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी एसआयटीऐवजी स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवावी, असे सिब्बल म्हणाले. यावर, कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. या प्रकरणाचे राजकारण होऊ नये, अशी आमची इच्छा आहे, असे सांगत न्यायालयाने स्वतंत्र विशेष तपास पथक स्थापन करून तपास करण्याचे निर्देश दिले.
 

Web Title: supreme court directs now new sit team to investigate tirupati laddu controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.