श्रीदेवीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:34 PM2018-05-11T12:34:21+5:302018-05-11T12:34:21+5:30
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने...
नवी दिल्ली - बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या मृत्युविषयी गुढ निर्माण झाले होते. दरम्यान, श्रीदेवींच्या मृत्युभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांच्या मृत्यूविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यातूनच श्रीदेवींच्या अकाली मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका चित्रपट दिग्दर्शक सुनील सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
फेब्रुवारी महिन्यात श्रीदेवी यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालात श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचे तसेच त्यांच्या शरीरात मद्याचे अंश आढळल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर श्रीदेवींच्या मृत्यूबाबत गुढ निर्माण झाले होते. हे प्रकरण हायप्रोफाइल असल्याने दुबई पोलिसांनी सखोल तपास करत श्रीदेवींचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमधील स्टाफ तसेच पती बोनी कपूर आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली होती.
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला. त्यांनी अभिनयाची सुरुवात लहान असतानाच सुरु केली होती. 1978 साली सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले.
निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.