२०० लोकांचा मृत्यू झाल्याचा काही पुरावा आहे का?; दिल्लीतील चेंगराचेंगरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:35 IST2025-02-28T18:33:43+5:302025-02-28T18:35:21+5:30
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली

२०० लोकांचा मृत्यू झाल्याचा काही पुरावा आहे का?; दिल्लीतील चेंगराचेंगरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल
New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यादरम्यान एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी धावपळ सुरु झाली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. दरम्यान आता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. या घटनेत २०० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता.
सुप्रीम कोर्टानं १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी घेण्यास करण्यास नकार दिला. चेंगराचेंगरीत २०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. न्यायालयाने अधिकाऱ्यांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. याचिकाकर्ते आनंद लीगल एड फोरम ट्रस्टने असाही दावा केला होता की रेल्वे प्रशासन मृत्यूची खरी संख्या लपवत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार चेंगराचेंगरीत सुमारे २०० मृत्यू झाले होते.
या याचिकेवर न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती पीके मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने २०० लोकांच्या मृत्यूचा काही पुरावा आहे का? असा सवाल याचिकाकर्त्यांच्या वकिलांना केला. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलाने, रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीचे अनेक व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आले आहेत. तसेच तिथे उपस्थित असलेल्या साक्षीदारांना रेल्वेने नोटीस बजावली आहे, असं म्हटलं. यावर खंडपीठाने त्या व्यक्ती कोर्टात जाऊ शकतात, असं म्हटलं.
यावर खंडपीठाने संबंधित अधिकारी या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे याचिकाकर्त्याला वाटत आहे का? असा सवाल केला. याला उत्तर देताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि गर्दी नियंत्रणासाठी संबंधित नियमांच्या योग्य अंमलबजावणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे वकिलाने सांगितले. त्यानंतर खंडपीठाने याचिका फेटाळून लावली आणि याचिकाकर्ता आपली तक्रार घेऊन दिल्ली उच्च न्यायालयात जाऊ शकतो, असं म्हटलं.
दरम्यान, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर १९ फेब्रुवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने रेल्वेला जास्तीची प्रवासी संख्या आणि प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री या मुद्द्यावर लक्ष देण्यास सांगितले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने या मुद्द्यांवर घेतलेल्या निर्णयांचा तपशील प्रतिज्ञापत्रात सादर करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले होते. १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे किमान १८ जणांचा मृत्यू झाला होता. प्रयागराजमध्ये महाकुंभला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झालेली असताना ही घटना घडली.