एक रुपया दंड भरा, अन्यथा ३ महिने तुरुंगवास; अवमान प्रकरणात प्रशांत भूषण यांना 'सर्वोच्च' शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:31 PM2020-08-31T12:31:40+5:302020-08-31T13:05:40+5:30
१५ सप्टेंबरपर्यंत दंड भरण्याची मुदत; अन्यथा तुरुंगवासाची शिक्षा
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या विरोधात दोन ट्विटद्वारे शेरेबाजी करणारे ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. १ रुपयांचा दंड भरण्याचे आदेश त्यांना न्यायालयानं दिले आहेत. भूषण यांना दंड भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत दंड न भरल्यास त्यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय ३ वर्षांपर्यंत त्यांची प्रॅक्टिसदेखील रद्द केली जाऊ शकते.
Supreme Court imposes a fine of Re 1 fine on Prashant Bhushan. In case of default, he will be barred from practising for 3 years & will be imprisoned of 3 months https://t.co/0lMbqiizBb
— ANI (@ANI) August 31, 2020
न्यायालयानं २५ ऑगस्टच्या सुनावणी दरम्यान भूषण यांना माफी मागण्यास सांगितलं होतं. माफी मागण्यात काय चूक आहे, असा सवाल न्यायालयानं त्याना विचारला होता. मात्र भूषण यांनी माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. भूषण यांना समज देण्यात यावी, असं ऍटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयानं सुचवलं होतं. त्यावर प्रशांत भूषण यांचे वकील राजीव धवन यांनी माझ्या अशिलानं कोणतीही चोरी किंवा खून केलेला नाही, अशा शब्दांमध्ये प्रतिवाद केला.
न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या घटनापीठानं भूषण यांनी न्यायालय अवमान प्रकरणात शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयानं १४ ऑगस्टला भूषण यांनी दोषी ठरवलं होतं. भूषण यांनी केलेल्या दोन ट्विटमुळे न्यायालयाचा अपमान झाल्यानं त्यांना दोषी ठरवण्यात आलं. भूषण यांनी विद्यमान सरन्यायाधीश आणि माजी सरन्यायाधीश यांच्या कार्यप्रणालीवरून टीका केली होती.
'प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यप्रणालीवर हल्ला केला आहे. अशा प्रकारचे हल्ले न रोखल्यास राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का बसेल. लोकांना न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि तोच न्याय व्यवस्थेचा पाया आहे. न्याय व्यवस्थेच्या पायालाच धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास लोकांच्या मनात न्याय व्यवस्थेबद्दल अनास्था निर्माण होईल. प्रशांत भूषण यांनी केलेले आरोप खोटे आहेत. अशा प्रकारच्या आरोपांमुळे लोकांच्या मनात न्याय व्यवस्थेबद्दल अनादार निर्माण होईल,' असं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी खटल्यावरील सुनावणीवेळी म्हटलं.