ममतांना 'सुप्रीम' धक्का; निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेवरील स्थगिती हटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 11:48 AM2019-05-17T11:48:44+5:302019-05-17T11:52:19+5:30
ममता विरुद्ध मोदी संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय अधिकारी मानले जाणाऱ्या राजीव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिला आहे. कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त असलेल्या राजीव यांच्या अटकेला देण्यात आलेली स्थगिती न्यायालयानं हटवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं राजीव यांना अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं आहे. यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसांत अटकपूर्व जामीन न मिळाल्यास सीबीआय राजीव यांना अटक करू शकते, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं.
Supreme Court vacates interim protection given to former Kolkata Police Commissioner Rajeev Kumar from arrest by CBI over his alleged role in destroying evidence in Saradha chit fund case. Court gives seven days to Rajeev Kumar to seek legal remedies. pic.twitter.com/qw9uphvpdQ
— ANI (@ANI) May 17, 2019
राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी फेब्रुवारी महिन्यात कोलकात्याला गेले होते. त्यावेळी कोलकाता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर राजीव यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अद्याप या प्रकरणात सीबीआयनं एफआयआर दाखल केलेला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय राजीव कुमार यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावू शकते.
काय आहे प्रकरण? कोण आहेत राजीव कुमार?
शारदा चिटफंड प्रकरणात राजीव कुमार यांचं नाव आलं होतं. त्यामुळे सीबीआयला कुमार यांची चौकशी करायची होती. कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याचा प्रयत्नदेखील सीबीआयनं केला होता. मात्र कुमार यांना अटक करण्यापूर्वीच कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. सीबीआयची कारवाई केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरुन होत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला होता. याविरोधात ममता बॅनर्जी धरणं आंदोलन केलं होतं.