पत्रकारास सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; उत्तर प्रदेश सरकारला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 07:22 AM2019-06-12T07:22:05+5:302019-06-12T07:22:18+5:30
प्रशांत कनोजिया यांनी आक्षेपार्ह शेरेबाजी करणे चुकीचेच आहे,
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत समाजमाध्यमात आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याच्या आरोपावरून अटक केलेले पत्रकार प्रशांत कनोजिया यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांची तत्काळ मुक्तता करावी असे आदेशही दिले आहेत. नागरिकांचे स्वातंत्र्य ही अत्यंत पवित्र गोष्ट असून तिच्याबाबत तडजोड होऊ शकत नाही असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला सुनावले आहेत.
प्रशांत कनोजिया यांनी आक्षेपार्ह शेरेबाजी करणे चुकीचेच आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने या पत्रकाराचेही कान उपटले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. इंदिरा बॅनर्जी, न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. नागरिकांचे स्वातंत्र्य हा त्यांना राज्यघटनेने दिलेला मुलभूत अधिकार असून त्यावर सरकार गदा आणू शकत नाही असेही या खंडपीठाने म्हटले.
आपण योगी यांना लग्नाचा प्रस्ताव पाठविला आहे असे सांगणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ प्रशांत कनोजिया यांनी फेसबुक व टिष्ट्वटरवर झळकविला होता. या व्हिडीओमध्ये आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधाने केलेली असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप ठेवून कनोजियांवर हजारीगंज पोलिसांनी गुन्हा नोंदविला. दरम्यान, योगी आदित्यनाथ मूर्खासारखे वागत असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.