बारावी निकालाच्या निकषांची माहिती दोन आठवड्यांत द्या- सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:01 AM2021-06-04T08:01:20+5:302021-06-04T08:01:42+5:30
परीक्षा रद्द केल्याबद्दल व्यक्त केला आनंद
नवी दिल्ली : बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल कोणत्या निकषांवर जाहीर करणार, त्यांचे मूल्यांकन कसे केले जाईल? याची माहिती दोन आठवड्यांच्या आत सादर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई व आयसीएसईला दिला आहे. कोरोना साथीमुळे यंदा सीबीएसईची बारावीची परीक्षा न घेण्याच्या केंद्राने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आनंद व्यक्त केला.
बारावीचे निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करायचे याची माहिती सादर करण्यासाठी केंद्राने न्यायालयाकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने गुण द्यावेत याची पद्धती ठरविण्यासाठी कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स या संस्थेने चार आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, त्यामुळे विदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन सीआयएससीईची विनंती सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील व न्या. दिनेश महेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने अमान्य केली. विविध राज्यांतील शिक्षण मंडळांनी बारावीची परीक्षा रद्द केली असून, त्यामुळे १.२ कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे याचिकाकर्त्या ममता शर्मा यांनी म्हटले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडविले जातील. आधी बारावीच्या परीक्षांचे निकाल कोणत्या पद्धतीने लावायचे, हा प्रश्न सोडविला जाईल. सर्वांनी थोडा संयम बाळगला पाहिजे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दोन आठवड्यांनी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे. केंद्रातर्फे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल व सीआयएससीईचे वकील जे. के. दास यांनी न्यायालयात बाजू मांडली.