स्वयंभू बाबा स्वामी ओम यांना सुप्रीम कोर्टाने ठोठावला दहा लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 05:55 PM2017-08-24T17:55:47+5:302017-08-24T17:58:03+5:30
बेताल विधानांनी वाद निर्माण करुन सदैव प्रसिद्धीच्या झोतात राहणारे स्वामी ओम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. स्वामी ओम यांना सुप्रीम कोर्टाने दहा लाखांचा दंड ठोठावला आहे.
नवी दिल्ली, दि. 24 : बेताल विधानांनी वाद निर्माण करुन सदैव प्रसिद्धीच्या झोतात राहणारे स्वामी ओम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. स्वामी ओम यांना सुप्रीम कोर्टाने दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. देशाचे नवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीला स्वामी ओम यांनी विरोध केला होता. दीपक मिश्रा यांची ही नियुक्ती बेकायदा असल्याचा दावा स्वामी ओम यांनी कोर्टात केला होता.
दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीवर स्वामी ओम यांनी केलेली याचिका कोर्टाने तातडीने फेटाळून लावली. याशिवाय, फक्त लोकप्रियेतेसाठी ही याचिका केल्याचे म्हणत 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला.
दरम्यान, स्वामी ओम यांनी आपल्याकडे एकही रुपया नाही, त्यामुळे मी दंड भरु शकत नाही, असं म्हटलं. त्यावर, तुमच्याकडे 34 कोटी अनुयायी असल्याचा दावा करता, मग त्यांच्याकडून एक-एक रुपये जरी घेतला, तरी दंड भरु शकाल, असं कोर्टाने सुनावलं.
दरम्यान, तिहेरी तलाकच्या निकालावर प्रतिक्रिया देत असताना स्वामी ओमला मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून स्वामी ओमच्या एका समर्थकाला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी तिहेरी तलाकची प्रथा मोडीत काढली. निकालामुळे सुप्रीम कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांची गर्दी होती. या निकालावर प्रतिक्रिया देण्यासाठी स्वामी ओमही तिथे पोहोचला. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या ठिकाणी उभे होते तिथे ओम स्वामी घुटमळत होता. शेवटी एका पत्रकाराने या वृत्तावर स्वामी ओमला प्रतिक्रिया विचारली. स्वामी ओमही प्रतिक्रिया देण्यासाठी सरसावला. मात्र त्याने बोलायला सुरुवात करताच तिथे थांबलेले काही तरुण संतापले. स्वामी ओम काहीही बरळतो असे सांगत त्या तरुणांनी स्वामीला रोखले. यानंतर त्याला धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केला. स्वामी ओमच्या एका शिष्याने त्या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरुणांनी त्यालाही चांगलेच चोपले. प्रकरण चिघळत असल्याने बघून स्वामी ओमने तिथून काढता पाय घेतला.