परमबीर यांच्यावरील गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवा; राज्य सरकारला सर्वोच्च दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 08:37 AM2022-03-25T08:37:31+5:302022-03-25T08:37:54+5:30
नागरिकांचा विश्वास मिळविण्यासाठी सखोल तपासाची गरज आहे, असे खडे बोल सुनावत सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांच्याविरोधातील सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचा आदेश गुरुवारी दिला.
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधातील प्रकरणांचा तपास कोणी करायला हवा याबाबत महाराष्ट्र सरकारमध्ये प्रचंड अस्पष्टता आहे. नागरिकांचा विश्वास मिळविण्यासाठी सखोल तपासाची गरज आहे, असे खडे बोल सुनावत सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांच्याविरोधातील सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचा आदेश गुरुवारी दिला.
या खटल्यांशी संबंधित सर्व रेकाॅर्ड आठवडाभरात सीबीआयकडे साेपविण्याचे निर्देश न्यायालयाने महाराष्ट्र पाेलिसांना देण्यात आले आहेत. न्या. एस. के. काैल आणि न्या. एस. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमाेर या प्रकरणाची सुनावणी झाली. परमबीर यांचे निलंबन रद्द करण्यास मात्र न्यायालयाने नकार दिला. तसेच भविष्यातील सर्व प्रकरणेदेखील सीबीआयकडेच हस्तांतरित करण्यात येतील. सीबीआयला तपासामध्ये संपूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही, न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना दिले. उच्च न्यायालयाने हा एक सेवेसंबंधी विवाद असल्याचे म्हटले आहे. मात्र, तसे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सत्य बाहेर येणे आवश्यक
महाराष्ट्र सरकार व परमबीर सिंह गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांवर आराेप करीत आहेत. त्यामुळे जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांनीच परमबीर सिंह यांची नियुक्ती केली. पडद्यामागे बऱ्याच
गोष्टी सुरू आहेत. या प्रकरणात गुंतलेल्या दोन व्यक्तींची नक्कीच चौकशी व्हायला हवी. सत्य बाहेर
येणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले.
सर्वाेच्च न्यायालयाने सुनावले खडे बाेल
सत्य काय आहे, काेणाची चूक आहे, या प्रकारची परिस्थिती का निर्माण झाली, इत्यादींचा तपास व्हायला हवा. सीबीआयने या सर्व मुद्द्यांची नि:ष्पक्ष चाैकशी करायला हवी.
याचिकाकर्त्यांच्या विराेधात तक्रार करणाऱ्यांनीच गुन्हे दाखल केले आहेत. हे स्वीकारणे अशक्य आहे. राज्य सरकारनेच सीबीआयला या प्रकरणांचा तपास करण्यास परवानगी द्यायला हवी हाेती.
कोणीही धुतल्या तांदळासारखा नाही!
परमबीर सिंह किंवा याप्रकरणात गुंतलेल्या इतर व्यक्ती ‘व्हीसल ब्लाेअर’ आहेत, असे आम्ही म्हणत नाही. मात्र, ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले.
परमबीर यांच्यावरील पाच गुन्हे
भाईंदरमधील बांधकाम व्यावसायिकाकडे १५ काेटींची खंडणीची मागणी. मरिन ड्राईव्ह पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काेपरी पाेलीस ठाण्यात खंडणी, फसवणूक व अपहरणाप्रकरणी गुन्हा
व्यावसायिक केतन तन्नाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पाेलीस निरिक्षकाने केलेल्या तक्रारीवरुन बाजारपेठ पाेलीस ठाण्यात गुन्हा वर्ग
हाॅटेल सुरू ठेवण्यासाठी विमल अग्रवाल यांच्याकडून खंडणीची मागणी, गाेरेगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल.