'त्या' 50 कोटी मोबाईल नंबरला मिळाला 'आधार'; सेवा अखंडितपणे सुरुच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 01:35 PM2018-10-18T13:35:16+5:302018-10-18T13:39:32+5:30
50 कोटी मोबाईल नंबरवरील सेवा खंडित होणार नाही
नवी दिल्ली: आधार क्रमांक देऊन सिम कार्ड घेतलेल्या ग्राहकांची सेवा खंडित केली जाणार नाही, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं आधार कार्डबद्दल दिलेल्या निकालामुळे 50 कोटी मोबाईल नंबरवरील सेवा खंडित होणार असल्याचं वृत्त होतं. त्यामुळे कोट्यवधी मोबाईल ग्राहकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरण यांनी संयुक्तपणे एक निवेदन प्रसिद्ध केलं. आधार कार्ड देऊन सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांची सेवा तशीच सुरू राहील, असं या निवेदनातून स्पष्ट करण्यात आलं.
देशातील कोट्यवधी ग्राहकांनी सिम कार्ड घेताना मोबाईल कंपन्यांना आधार क्रमांक दिला आहे. मात्र खासगी कंपन्यांना आधार कार्ड क्रमांक देण्याची गरज नसल्याचा निकाल काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं दिला. त्यामुळे ज्यांनी आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतली, त्यांचं काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला. या ग्राहकांची सेवा बंद केली जाऊ शकते, असं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं होतं. मात्र आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेल्या 50 कोटी ग्राहकांची सेवा अखंडितपणे सुरू होईल, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं दिलं.
आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेले ग्राहक पुन्हा एकदा केवायसी पडताळणी करुन घेऊ शकतात, असं दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं निवेदनातून स्पष्ट केलं. मात्र ही पडताळणी करायची की नाही, हे ग्राहकांवर अवलंबून असेल. पडताळणीचा हा निर्णय पूर्णपणे ऐच्छिक स्वरुपाचा असेल, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. ज्यांनी आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतली आहे, त्यांची सेवा खंडित करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला नाही, ही महत्त्वाची बाब निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आली आहे.