अयोध्या प्रकरणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 08:18 PM2019-03-05T20:18:33+5:302019-03-05T20:19:26+5:30
अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मस्जिद विवादीत जागेच्या वादावर हे प्रकरण मध्यस्थी करण्यासाठी द्यावे की नाही यावर सुप्रीम कोर्ट बुधवारी निर्णय देणार आहे
दिल्ली - अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मस्जिद विवादीत जागेच्या वादावर हे प्रकरण मध्यस्थी करण्यासाठी द्यावे की नाही यावर सुप्रीम कोर्ट बुधवारी निर्णय देणार आहे. मागील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षकारांना चर्चा करून या प्रकरणावर तोडगा काढण्याचा विचार करावा असा सल्ला दिला होता. चर्चा करून यावर तोडगा निघत असेल तर तसा प्रयत्न करणे गरजेचे आहे. बुधवारी सुप्रीम कोर्ट दोन्ही पक्षकारांना आपली मते मांडण्याची संधी देऊन हे प्रकरण मध्यस्थाकडे पाठवावे की नाही यावर निर्णय देणार आहे.
दरम्यान मुस्लिम पक्षकारांच्या वकीलांनी चर्चेसाठी प्रयत्न केले जाऊ शकतात मात्र हिंदू पक्षकारांच्या वकीलांना असा प्रयत्न याआधीही करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे मध्यस्थी करण्याची शक्यता फार कमी वाटते. मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले की मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो त्याचा आम्ही विरोध करणार नाही मात्र रामलल्लाचे वकील सीएस वैघनाथन यांनी याचा विरोध करत याआधीही मध्यस्थी करून अयोध्या प्रश्नी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो अयशस्वी झाला असल्याचे सांगितले.
तसेच याबाबत अन्य हिंदु पक्षकारांचे वकील रंजीत कुमार यांनी विवादीत प्रकरणावर मध्यस्थी करण्याची भूमिकेची शक्यता नसून सुप्रीम कोर्टाने पुढे सुनावणी सुरू ठेवली पाहिजे अशी भूमिका घेतली. वैघनाथन यांनी सांगितले की विवादीत जागा ही रामजन्म भूमी आहे त्यावर मध्यस्थी होऊच शकत नाही यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले होते की, पक्षकारांच्या मर्जीच्या विरोधात कोणाताही निर्णय घेतला जाणार नाही पुढील सुनावणी वेळी दोन्ही पक्षकारांनी या प्रकरणावर कसा तोडगा काढला जाऊ शकतो याबाबत सुप्रीम कोर्टात माहिती द्यावी. त्यामुळे उद्या होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.