सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात; अविश्वास ठरावावर शिवसेनेचा युक्तीवाद सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 05:24 PM2022-06-29T17:24:04+5:302022-06-29T17:24:33+5:30
विरोधी पक्षाने सांगितल्यावर लगेचच राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. सत्तेत असलेल्या एकाही पक्षाने अद्याप पाठिंबा काढल्याचे पत्र दिलेले नाही
राज्यपालांनी भाजपाचे नेते भेटून जात नाही तोच विधानसभेत बहुमत चाचणीचे आदेश देण्यात आले, यामुळे राज्यपालांनी घाई घाईने हा निर्णय घेतल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात करत बहुमत चाचणीवर शिवसेनेने सकाळी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे.
यावर शिवसेनेचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद करण्यास सुरुवात केली आहे. बहुमत चाचणीला सर्व आमदार उपस्थित हवेत, तेव्हाच ही चाचणी होऊ शकते. आम्हाला आजच हे पत्र मिळाले. उद्या चाचणी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे हे अतिघाईने आणि संविधानाविरोधात असल्याचा युक्तीवाद सिंघवी यांनी केला.
विरोधी पक्षाने सांगितल्यावर लगेचच राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. सत्तेत असलेल्या एकाही पक्षाने अद्याप पाठिंबा काढल्याचे पत्र दिलेले नाही. यामुळे ही बहुमत चाचणी थांबवावी अशी मागणी सिंघवी यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत, दोन आमदारांना कोरोना झालेला आहे. यामुळे ही चाचणी घेणे चुकीचे आहे, असेही सिंघवी यांनी न्यायालयासमोर म्हटले आहे.
कोण पात्र आणि कोण अपात्र हे आधी ठरवायला हवे, काँग्रेसचे एक आमदार परदेशात आहेत. ते कसे उपस्थित राहणार, असेही सिंघवी म्हणाले.