सर्वोच्च न्यायालय ही तर सर्वात बेशिस्त जागा; न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 06:23 IST2025-01-09T06:23:21+5:302025-01-09T06:23:37+5:30
भूषण गवई हे मे महिन्यात होणार सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालय ही तर सर्वात बेशिस्त जागा; न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले परखड मत
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय ही सर्वांत बेशिस्त जागा आहे अशी टीका त्या न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केली आहे. मी मुंबई उच्च न्यायालय, या न्यायालयाचे औरंगाबाद, नागपूर खंडपीठ येथेही काम केले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाइतके बेशिस्त वातावरण मी कुठेही पाहिलेले नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे येत्या मे महिन्यात निवृत्त होत असून त्या पदावर गवई हे विराजमान होणार आहेत. गवई यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील वातावरणाची तुलना केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील दालनात सहा वकील एका बाजूला तर सहा वकील दुसऱ्या बाजूला बसलेले असतात. एकाच वेळी सर्वजण हे बोलत असतात. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होते.
उच्च न्यायालयात काम करताना असे दृश्य मला कधीही पाहायला मिळाले नाही. न्यायालयीन कामकाजात अडथळे आणणाऱ्या वकिलांबाबत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होते तेव्हा तिथे असलेले वातावरण त्यांनी यापूर्वी कधीही अनुभवलेले नसते. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना कोणीही कधीही बोलत असतो. या न्यायालयात अतिशय बेशिस्तीचे वातावरण असते. - भूषण गवई, न्यायमूर्ती
मे महिन्यात गवई होणार सरन्यायाधीश
विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त झाल्यानंतर खन्ना हे या पदावर विराजमान झाले होते. खन्ना यांच्या निवृत्तीनंतर सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण गवई विराजमान होतील.
सरन्यायाधीशपदी अनुसूचित जातीतील पहिली व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती के. जी. बालकृष्ण होते. त्या प्रवर्गातील सरन्यायाधीशपदी दुसरी व्यक्ती विराजमान होण्याचा मान न्यायमूर्ती भूषण गवई यांना मिळणार आहे.