साधूंच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्राला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 05:25 AM2020-06-12T05:25:12+5:302020-06-12T05:25:21+5:30
दोन याचिका दाखल : पुढील सुनावणी जुलैमध्ये
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधूंसह तीन जणांचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी दाखल दोन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र सरकारकडून म्हणणे मागवले आहे. या हत्येची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) चौकशी केली जावी, अशी मागणी या याचिकांत करण्यात आली आहे.
अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी केली. या दोन याचिकांपैकी एक याचिका ही ‘श्री पंच दशभान जुना आखाडा’चे साधू आणि मृत साधूंच्या नातेवाईकांनी केलेली आहे. त्यांनी याचिकेत महाराष्ट्राचे पोलीस या हत्येची पक्षपाती चौकशी करीत आहेत, असा आरोप केला आहे.
दुसरी याचिका एनआयएनकडून चौकशी केली जावी या मागणीची असून ती घनश्याम उपाध्याय यांची आहे. या याचिकेवर आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल.