सर्वोच्च न्यायलयात झाली खडाजंगी

By admin | Published: July 30, 2015 02:07 AM2015-07-30T02:07:29+5:302015-07-30T02:07:29+5:30

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मृत्यूदंड झालेला एकमेव गुन्हेगार याकूब मेमन याने फाशी वाचविण्यासाठी गेला आठवडाभर चालविलेल्या प्रयत्नांत केलेली अखेरची याचिका सर्वोच्च

Supreme Court Judgment | सर्वोच्च न्यायलयात झाली खडाजंगी

सर्वोच्च न्यायलयात झाली खडाजंगी

Next

नवी दिल्ली : मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मृत्यूदंड झालेला एकमेव गुन्हेगार याकूब मेमन याने फाशी वाचविण्यासाठी गेला आठवडाभर चालविलेल्या प्रयत्नांत केलेली अखेरची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या खास नेमलेल्या त्रीसदस्यीय खंडपीठाने बुधवारी सायंकाळी फेटाळली. त्याआधी झालेल्या युक्तिवादात अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी याकूबला ‘देशद्रोही’ असे संबोधल्याने त्यांच्यात आणि याकूबच्या फाशीच्या विरोधात असलेले ज्येष्ठ वकील टी. आर. अंध्यारुजिना यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
याकूबच्या याचिकेवर न्या. दीपक मिश्रा, न्या. प्रफुल्ल चंद्र पंत आणि न्या. अमिताव रॉय यांच्या खंडपीठापुढे सुमारे पाच तास सुनावणी झाली. त्यात दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधील ‘कॅपिटल पनिशमेंट लिटिगेशन फोरम’ने सहभागी होऊन याकूबच्या बाजूने युुक्तिवाद केला. याकूबच्या वतीने ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांच्या युक्तिवाद संपल्यावर फोरमची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील अंध्यारुजिना उभे राहिले. तेव्हा याकूबला ‘देशद्रोही’ असे संबोधत अ‍ॅटर्नी जनरल अंध्यारुजिना यांना उद्देशून म्हणाले की, अशा देशद्रोह्याच्या वतीने बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही.
यावर, एरवी शांत स्वभावाचे असलेले, अंध्यारुजिना काहीसे संतापून उत्तरले, फाशीवर चढणाऱ्या गुन्हेगाराने शेवटच्या क्षणापर्यंत दयेची याचना करणे हा काही मेहेरबानीचा विषय नाही. याकूबचा प्राण शेवटच्या एका आशेच्या धाग्यावर अडकलेला असताना त्याने प्राण वाचविण्यासाठी चालविलेल्या अखेरच्या प्रयत्नांची अशी थट्टा केली जाऊ शकत नाही, असे अंध्यारुजिना म्हणाले.यावर रोहटगी यांनी बॉम्बस्फोटांमध्ये प्राण गमावलेल्या २५७ जणांच्या आणि जखमी झालेल्या आणखी शेकडो लोकांच्या हक्कांचे काय, असा प्रश्न केला. याकूबला फाशी देऊ नये यासाठी सुमारे २९१ मान्यवरांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्राचा अंध्यारुजिना यांनी संदर्भ दिला तेव्हाही रोहटगी यांनी सर्वोच्च न्यायालयानेच त्यांच्या निकालपत्रात याकूबला देशद्रोही म्हटले असल्याचा रोहटगी यांनी उल्लेख केला. यावर अंध्यारुजिना म्हणाले की, अ‍ॅटर्नी जनरलसारख्या सर्वोच्च न्यायिक अधिकाऱ्याने अशी दुष्मनी मनात ठेवून बोलणे शोभणारे नाही. याकूब देशद्रोही असेल तर राष्ट्रपतींनी त्याला त्याबद्दल विचारावे.
युक्तिवाद सुरु असतानाच रोहटगी एसएमएस संदेश वाचला. याकूबने राष्ट्रपतींकडे नव्याने दयेचा अर्ज केला आहे, असा तो संदेश होता. याचा संदर्भ देत रोहटगी म्हणाले की, अशा प्रकारे ते रोज नवा दयेचा अर्ज करीत राहतील व याला काही अंतच राहणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)

याकूबचे मुद्दे फेटाळले
याकूबने त्याच्या या शेवटच्या याचिकेत मांडलेले सर्व मुद्दे फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने थोडक्यात असा निकाल दिला-
-क्युरेटिव्ह याचिकेवर तीन ज्येष्ठतम न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय घेण्याने नियमांचा भंग झालेला नाही. त्यामुळे त्यावर नव्याने सुनावणी घेण्याची गरज नाही.
-‘टाडा’ न्यायालयाने काढलेल्या ‘डेथ वॉरन्ट’मध्ये काहीही त्रुटी नाही व ते पूर्णपणे वैध आहे.
-‘डेथ वॉरन्ट’ बजावल्यानंतर प्रत्यक्ष फाशीपर्यंत आपल्याला किमान १५ दिवसांचा
अवधी दिला गेला नाही, या याकूबच्या म्हणण्यालाही काही आधार नाही.
-याकूबने राज्यपाल व राष्ट्रपतींकडे केलेल्या दयेच्या अर्जांशी आमचा काही संबंध नाही कारण तो विषय न्यायालयीन कक्षेतील नाही.

Web Title: Supreme Court Judgment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.