मराठा आरक्षणासंबंधी सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय, 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 12:44 PM2021-02-05T12:44:07+5:302021-02-05T12:47:10+5:30
maratha reservation : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात ८ ते १८ मार्च दरम्यान सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर ८ मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात शुक्रवारी मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. यावेळी सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात ८ ते १८ मार्च दरम्यान सुनावणी होणार आहे. यामध्ये ८, ९ आणि १० मार्चला याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. याचबरोबर, जर ८ मार्चपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नसेल तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनच सुनावणी होईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय, १२, १५. १६ आणि १७ तारखेला राज्य सरकारला युक्तिवादासाठी वेळ देण्यात आलेला असून त्यांची बाजू ऐकली जाईल. १८ मार्चला काही नवे मुद्दे असल्यास त्यासंबंधी सुनावणी होणार आहे. त्याचदिवशी केंद्र सरकारची बाजू ऐकली जाईल. म्हणजेच ८ मार्चला अंतिम सुनावणीला सुरुवात होईल आणि १८ तारखेपर्यंत असेल असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.
Maratha Reservation: Court planning to commence hearing on March 8.
— Bar & Bench (@barandbench) February 5, 2021
Bench asks Senior Counsel to be physically present.
दरम्यान, व्हर्च्युअल सुनावणीत अडचण येत असून प्रत्यक्ष सुनावणी व्हावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आली. यावर सुप्रीम कोर्टाने सुनावणीचे वेळापत्रक आखून दिले आहे. यामध्ये पहिली वेळ मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे, असे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले.
"८,९ आणि १० तारखेला आरक्षणला विरोध करणारे आपली बाजू मांडतील. यानंतर १२, १५, १६ आणि १७ तारखेला ज्यांचे समर्थन आहे असे लोक म्हणजेच मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव आणि इतरांना वेळ देण्यात आली आहे. १८ तारखेला केंद्राच्या वतीने बाजू मांडण्यात येणार आहे. ८ ते १८ मार्च या कालावधीत प्रत्येकाला आपले म्हणणे लेखी स्वरुपात सादर करायचे आहे," असे विनोद पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.