तिहार जेल कर्मचाऱ्यांना दिलेल्या १२.५ कोटी लाचेची पूर्ण माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 10:47 AM2022-07-15T10:47:13+5:302022-07-15T10:47:36+5:30
सुकेश चंद्रशेखरला जेलमध्ये पैसे कोणी दिले, कोठून आले, कोणाला दिले?
डॉ. खुशालचंद बाहेती
२०२१ पासून तिहार जेलमध्ये असणाऱ्या सुकेश चंद्रशेखर या फसवणुकीतील आरोपीस जेल अधिकाऱ्यांना दिलेले साडेबारा कोटींचा स्रोत व वाटपाची सविस्तर माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने न्या. यू. यू. ललित, एस. रवींद्र भट व शुधांशु धुळीया यांनी दिले आहेत.
सुकेश चंद्रशेखर याने तिहार जेल अधिकाऱ्यांपासून धोका आहे म्हणून दुसऱ्या जेलमध्ये पाठवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या सुनावणीवेळी त्याने आतापर्यंत साडेबारा कोटी रुपयांची लाच जेल कर्मचाऱ्यांना दिली आहे; पण आता तो पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे त्याला त्रास देण्यात येत आहे. त्याच्या जीवाला धोका आहे, असा दावा केला आहे.
दिल्ली पोलीस व इडीने याची केस विरोध करताना सुकेश चंद्रशेखर जेलमधून खंडणीचे रॅकेट चालवत होता. दर महिन्याला जेल अधिकाऱ्यांना दीड कोटी लाच देत होता. या बदल्यात त्याला मोबाईल, स्वतंत्र बरॅक व खंडणी रॅकेटसाठी सुविधा मिळत होत्या. ८० जेल अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. अनेक निलंबित केले आहेत. १० अटक व अनेकांची बदली केली आहे. यामुळे मद्रास किंवा बेंगलोर येथील जेलमध्ये राहून आपला धंदा चालवण्याचा त्याचा विचार आहे, असे म्हणत याचिकेला विरोध केला.
सुप्रीम कोर्टाने सुकेश चंद्रशेखरला साडेबारा कोटी कोणी दिले, कोठून आले, कोणाला दिले, याची सविस्तर माहिती मागितली आहे. त्याच्या वकिलाने माहिती उघडपणे देता येणार नाही म्हणताच कोर्टाने ती द्यावीच लागेल, असे ठणकावले. तुम्ही सुरू केले आहे. याच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत आता झाले ते पुन्हा होणार नाही, हे आम्ही पाहू, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने यासाठी २६ जुलैपर्यंत वेळ दिला आहे.
कोण आहे सुकेश चंद्रशेखर?
- बेंगलोर येथे जन्मलेल्या ३२ वर्षीय सुकेशचे शिक्षण १२ वी पर्यंत आले आहे. स्वत:ला व्यावसायिक, राजकारणी व उद्योजक म्हणवतो. १५ फसवणुकीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
- मद्रास कॅफेमधील नायिका लीना मारीया पावलो हिच्याशी लग्न केले. त्याच्याकडे मद्रास बीचवर बंगला व अनेक महागड्या कारचा ताफा आहे.
- जॅकलीन फर्नांडिस, नोरा फतेहसह अनेकांची यापूर्वी इडीने सुकेशच्या प्रकरणांत चौकशी केली आहे.