योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, पत्रकार प्रशांत कनौजियांना सोडण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 12:27 PM2019-06-11T12:27:11+5:302019-06-11T12:35:47+5:30
अटकेप्रकरणी प्रशांत कनोजिया यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार प्रशांत कनौजिया यांची सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिले आहेत. तसेच, अशाप्रकारे एखाद्या नागरिकाच्या अधिकारांचे हनन केले जाऊ शकत नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश पोलिसांना फटकारले आहे.
अटकेप्रकरणी प्रशांत कनोजिया यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी आक्षेपार्ह पोस्टवर वेगवेगळे विचार असू शकतात, पण अटक का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने करत प्रशांत कनौजिया यांची सुटका करण्याचे आदेश दिले. तसेच, प्रशांत कनौजिया यांच्या पत्नीला हे प्रकरण हायकोर्टात घेऊन जाण्यास सांगितले.
Supreme Court orders immediate release of freelance journalist, Prashant Kanojia who was arrested by UP Police for 'defamatory video' on UP Chief Minister. pic.twitter.com/OTr47uEVSu
— ANI (@ANI) June 11, 2019
दरम्यान, नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांनी ट्विटर आणि फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये एक महिला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिसत आहे. यामध्ये ती म्हणते की, 'मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवला आहे.'
प्रशांत कनौजिया यांनी हा व्हिडीओ शेअर करून मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत शुक्रवारी रात्री लखनऊमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हजरतगंज पोलिसांनी दिल्लीतून प्रशांत कनौजिया यांना अटक करण्यात आली होती. या अटकेप्रकरणी प्रशांत कनौजिया यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती.