सेटलवाड यांच्या निकालात सुप्रीम कोर्टाने मर्यादा ओलांडल्या; प्रख्यात विधिज्ञ दुष्यंत दवे यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:03 PM2022-08-12T12:03:06+5:302022-08-12T12:05:01+5:30
गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना गुजरात एसआयटीने क्लीन चिट दिली होती.
नवी दिल्ली : गुजरात दंगलीप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या विरोधात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सर्व सीमा, मर्यादा ओलांडल्या, असे मत प्रख्यात विधिज्ञ दुष्यंत दवे यांनी व्यक्त केले. गुजरात दंगलीबाबत झाकिया जाफरी विरु्दध गुजरात सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गुजरात पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व गुजरातचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांना अटक केली होती.
गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना गुजरात एसआयटीने क्लीन चिट दिली होती. त्याला आव्हान देणारी झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच तिस्ता सेटलवाड यांची स्वयंसेवी संस्था व अन्य काही जणांनी खोटे पुरावे सादर केल्याचे ताशेरे ओढले होते.सेटलवाड व श्रीकुमार, संजीव भट्ट यांच्या विरोधातील निकालामुळे मी अस्वस्थ झालो. असा निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा संदेश दिला आहे असे दवे यांनी म्हटले आहे.
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत दवे म्हणाले की, २००२च्या गुजरात दंगलीप्रकरणी अनेक प्रकरणांत विधिज्ञ हरीश साळवे यांनी न्यायमित्र म्हणून काम पाहिले होते. तिस्ता सेटलवाड या गुजरात एसआयटी व हरीश साळवे यांच्या नेहमी संपर्कात होत्या. तिस्ता यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा केवळ घटनाबाह्यच नव्हे तर नैतिकतेलाही धरून नाही असेही दवे म्हणाले. (वृत्तसंस्था)
‘गोध्रा प्रकरणी पोलिसांना अपयश’
ख्यातनाम विधिज्ञ दुष्यंत दवे म्हणाले की, गोध्रा येथील हत्याकांड रोखण्यात गुजरात पोलिसांना अपयश आले. गोध्रामध्ये हिंसाचार उसळण्याची शक्यता आहे, असे संकेत मिळाले होते. तरीही ते हत्याकांड न रोखू शकलेल्या पोलिसांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.