आधार कार्ड वैध की अवैध? आज सर्वोच्च न्यायालय सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 08:07 AM2018-09-26T08:07:43+5:302018-09-26T08:46:28+5:30
आधार कार्डच्या वैधतेबद्दल चार महिने चालला युक्तिवाद
नवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेबद्दल आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. आधार कार्डच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या 27 याचिकांवर जवळपास चार महिने न्यायालयात युक्तिवाद चालला. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला. हा निकाल आज न्यायालयाकडून सुनावण्यात येईल.
आधार कार्डच्या वैधतेबद्दलची सुनावणी जानेवारीत सुरु झाली. जवळपास 38 दिवस या प्रकरणी युक्तिवाद सुरू होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं केंद्र सरकार आणि याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद ऐकला. आधार कार्डमुळे नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग होतो का, याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. गोपनीयतेचा अधिकार हा संविधानानं प्रत्येक नागरिकाला दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे याबद्दल सरकार काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
केंद्र सरकारनं कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलं होतं. त्यामुळे बँक खातं उघडण्यासाठी, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना तयार करण्यासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली. मोबाईल नंबर, बँक खातंदेखील आधारशी जोडण्याच्या सूचना सरकारनं दिल्या होत्या. मात्र यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप नोंदवला. यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचा भंग होत असून गोपनीयता संपुष्टात येत असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं. तर सरकारी योजनांच्या लाभार्थींना थेट अनुदान देता यावं, त्यात कोणताही घोटाळा होऊ नये, यासाठी आधार कार्ड अनिवार्य केल्याचा दावा केंद्र सरकारकडून न्यायालयात करण्यात आला.