“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:15 AM2024-05-29T10:15:09+5:302024-05-29T10:16:04+5:30
Arvind Kejriwal Supreme Court Petition News: अरविंद केजरीवाल लोकसभेचा निकाल कुठून पाहणार, हे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.
Arvind Kejriwal Supreme Court Petition News: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला होता. या अंतरिम जामिनाची मुदत ०२ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे अंतरिम जामिनाच्या मुदतीत वाढ करावी, अशी मागणी करणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु, या याचिकेवरील तत्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी अंतरिम जामिनाच्या मुदतीत ७ दिवसांची वाढ मिळावी, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामिनात सात दिवसांनी वाढ करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. त्यांच्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना निर्णय घेतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
तुमच्या याचिकेवर सरन्यायाधीश यावर निर्णय घेतील
अरविंद केजरीवाल यांना पीईटी-सीटी स्कॅन आणि अन्य वैद्यकीय चाचण्या करायच्या असल्यामुळे आणखी सात दिवसांची मुदतवाढ मिळावी, या सवलतीचा दुरुपयोग होणार नाही, अशी ग्वाही ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी दिली. गेल्या आठवड्यात न्या. दत्ता असताना ही याचिका का केली नाही, असाही प्रश्न न्यायमूर्तीनी विचारला, तेव्हा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले नव्हते, असे सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर, हा औचित्याचा मुद्दा असून सरन्यायाधीश यावर निर्णय घेतील, असे सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीकालीन पीठाने स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदान ०१ जूनला संपणार असून, त्या दिवशी अरविंद केजरीवाल यांना 'एक्झिट पोल'चे अंदाज बघता येतील. पण निकाल कुठे पाहणार, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने आरोपपत्र मंगळवारी दाखल करण्यात आले. राऊज अव्हेन्यू न्यायालयात त्यावर आरोपपत्रावर सुनावणी झाली. कथित मद्य धोरण घोटाळ्ळ्यात केजरीवाल आणि त्यांचा पक्ष गुंतला असल्याचा दावा ईडीने केला आहे. याप्रकरणी ४ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. अटक करण्यात आलेला अठरावा आरोपी विनोद चौहानशी केजरीवाल यांचे थेट पुरावे मिळाले असून त्याच्या नियुक्त्तीत केजरीवाल सामील होते. केजरीवाल या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा ईडीचा दावा आहे.