ज्ञानवापीत पूजा सुरुच राहणार! स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; CJI चंद्रचूड म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 02:36 PM2024-04-02T14:36:43+5:302024-04-02T14:38:34+5:30
Gyanvapi Case in Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही गोष्टी समजून घेत, दोन्ही पक्षकारांना अनेक प्रश्न विचारले. त्यानंतर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले.
Gyanvapi Case in Supreme Court: ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला होता. याला मुस्लिम पक्षाकडून विरोध करत अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, अहालाबाद उच्च न्यायालयाने पूजेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली होती. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले असून, ज्ञानवापी परिसरातील व्यास तळघरात सुरू असलेल्या पूजेला स्थगिती देण्यास नकार दिला.
ज्ञानवापी मशीद व्यवस्था समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून पूजेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मशीद समितीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ३० एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय झाले?
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मुस्लिम पक्षकार तसेच हिंदू पक्षकारांना अनेक प्रश्न विचारले. कुलूप उघडण्यापासून ते पूजा करण्याच्या परवानगीपर्यंत अनेक गोष्टींची माहिती घेतली. यानंतर नमाज अदा करायला जायचे आणि व्यास तळघर पूजा स्थानावर जायचे मार्ग वेगवेगळे आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही उपासना पद्धतींमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, असा आमचा विश्वास आहे. सध्या आम्ही यथास्थिती कायम ठेवत आहोत, असे चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता ज्ञानवापी परिसरातील व्यास तळघरात सुरू असलेली पूजा सुरूच राहणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता जुलै महिन्यात होणार आहे.
दरम्यान, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही गोष्टींबाबत दोन्ही पक्षकारांकडून स्पष्टीकरणही मागितल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, वाराणसी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी पूजा करण्याची जबाबदारी काशी विश्वनाथ ट्रस्टकडे दिली. त्यानंतर ज्ञानवापीतील व्यास तळघरात गणपती, श्रीविष्णू यांच्या एक, तर हनुमंतांच्या दोन, जोशीमठ येथील दोन प्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर राम नाम लिहिलेली एक वीट स्थापन करण्यात आली आहे. एक मकर आणि एक अखंड ज्योत स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय दिवसातून पाच वेळा आरतीही केली जात आहे.