गांधीजींच्या हत्येच्या फेरतपासाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:52 AM2018-03-29T03:52:52+5:302018-03-29T03:52:52+5:30
महात्मा गांधी यांच्या हत्येचा फेरतपास करावा आणि न्या. जीवनलाल कपूर आयोगाने गांधी हत्येचा स्वा. सावरकरांवर ठेवलेला ठपका पुसून टाकण्यासाठी
नवी दिल्ली: महात्मा गांधी यांच्या हत्येचा फेरतपास करावा आणि न्या. जीवनलाल कपूर आयोगाने गांधी हत्येचा स्वा. सावरकरांवर ठेवलेला ठपका पुसून टाकण्यासाठी नवा चौकशी आयोग नेमावा, या दोन्ही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळल्या.
याच मागण्यांसाठीची रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ‘अभिनव भारत’चे डॉ. पंकज कुमुदचंद्र फडणीस यांनी अपील केले होते. त्या अनुषंगाने गांधी हत्या खटल्याचा अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने ज्येष्ठ वकील अमरेंद्र शरण यांची ‘अॅमायकस क्युरी’ म्हणून नेमणूक केली होती. शरण यांचा अहवाल व फडणीस यांची नवी माहिती याचा विचार करून न्या. शरद बोबडे व न्या. एल. नागेश्वर राव यांनी अपील फेटाळले.
नवे मुद्दे उपस्थित करण्यातील विलंब हे अपील फेटाळण्याचे प्रमुख कारण आहे. गांधी हत्यसंदर्भात संशोधन करून नवी माहिती मिळविली व हत्येमागे ‘अदृश्य हात’ असल्याची खात्री पटल्यानंतरच आपण न्यायालयात आलो, असे फडणीस यांचे म्हणणे होते. परंतु ज्या खटल्यात काहींना आधीच फाशी दिली आहे व जन्मठेप झाली, त्यांचेही निधन झाले आहे, अशा खटल्याचा एवढ्या वर्षांनंतर पुन्हा विचार करण्याची तरतूद नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
गांधीजींवर तीन नव्हे तर चार गोळ््या झाडण्यात आल्या होत्या. तपासात व खटल्यात या चौथ्या गोळीचा उल्लेख नाही. या चौथ्या गोळीचे रहस्य उलगडण्यासाठी व नथुराम गोडसेखेरीज अन्य मारेकरी होता का हे शोधण्यासाठी नव्याने तपास व्हावा, असे फडणीस यांचे म्हणणे होते. परंतु खटल्यातील साक्षीपुराव्यांचा हवाला देत, गांधीजींवर तीनच गोळ््या झाडल्या होत्या व त्या नथुरामनेच झाडल्या होत्या, याखेरीज अन्य कोणताही निष्कर्ष निघत नसल्याचे न्यायलयाने नमूद केले.
गांधीजींच्या हत्येच्या कटाची आपणास आधीच माहिती होती, असे विधान लोकमान्य टिळकांचे नातू गं.वि. केतकर यांनी केल्याने वादळ उठले होते. त्यामुळे खटल्याचा निकाल लागून नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी दिली असूनही केंद्र सरकारने कटाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्या. कपूर यांचा आयोग नेमला.या आयोगाने १९६९ मध्ये अहवाल दिला. गांधी हत्येचा कट सावरकर व त्यांच्या गटाखेरीज अन्य कोणी रचला होता याला सर्व तथ्ये तपासल्यास छेद मिळतो, असा निष्कर्ष आयोगाने नोंदविला होता. याचा फेरविचार व्हावा किंवा नवा आयोग नेमावा, असे फडणीस यांचे म्हणणे होते. निर्दोष ठरूनही आयोगाने असा निष्कर्ष नोंदविणे सावरकरांवर अन्याय करणारे आहे, असे अॅड. शरण यांचेही म्हणणे होते. परंतु या निष्कर्षाने सावरकरांना निर्दोष मुक्त करण्याचा न्यायालयाचा निकाल बदलत नाही. हत्येचा ठपका आयोगाने सावरकरांवर ठेवल्याचा समज चुकीचा आहे, असे न्यायालयाने म्हटले.