जज लोया मृत्यू प्रकरणातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 07:47 PM2018-07-31T19:47:12+5:302018-07-31T19:47:28+5:30
सीबीआय न्यायालयाचे वकील बी. एच. लोया यांच्या मृत्यूचा तपास पुन्हा करावा यासाठी मुंबई वकील संघानं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
नवी दिल्ली- सीबीआय न्यायालयाचे वकील बी. एच. लोया यांच्या मृत्यूचा तपास पुन्हा करावा यासाठी मुंबई वकील संघानं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. जज लोया मृत्यूप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशा प्रकारची याचिका मुंबई वकील संघानं दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली असून, जज लोया यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचंही स्पष्ट केलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर जज लोया मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करणा-या याचिका फेटाळण्यात आल्या होत्या. त्यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्यांवर टिपण्णीही केली होती. जज लोया प्रकरणातील याचिका राजकीय हेतूनं प्रेरित होऊन दाखल केल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. तसेच न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे, असंही खडे बोल सर्वोच्च न्यायालयानं सुनावले होते.
काय आहे जज लोया मृत्यू प्रकरण ?
1 डिसेंबर 2014ला नागपूरमध्ये जज लोया यांचा मृत्यू झाला होता, आपल्या सहका-याच्या मुलीच्या लग्नाला जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. परंतु नोव्हेंबर 2017ला जज लोया यांचा मृत्यूबाबत त्यांच्या बहिणीनं संशय व्यक्त केला होता. त्यानंतर जज लोया मृत्यू प्रकरण चर्चेत आलं आणि त्याचा संबंध सोहराबुद्दीन शेख एकाऊंटरशी जोडण्यात आला होता. तसेच त्यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशीच्या मागणीची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 19 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयानं जज लोया यांच्या मृत्यू संबंधातील सर्वच याचिका फेटाळून लावल्या होत्या.