सर्वोच्च न्यायालय म्हणाले ‘सॉरी’, खटल्याला १३ वर्षे उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 03:44 AM2017-12-04T03:44:53+5:302017-12-04T03:45:10+5:30
एक गुन्हेगारी खटला सुरू होण्यास १३ वर्षे लागल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने खंत व्यक्त करीत ‘सॉरी’ म्हटले आहे.
नवी दिल्ली : एक गुन्हेगारी खटला सुरू होण्यास १३ वर्षे लागल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने खंत व्यक्त करीत ‘सॉरी’ म्हटले आहे. उच्च न्यायालयाकडून दोन वेगवेगळ्या; पण एकदुसºयाशी संबंधित प्रकरणात एकाच दिवशी दोन विरोधाभासी आदेश दिल्यामुळे या खटल्याच्या सुनावणीस उशीर झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, यामुळे एक कायदेशीर समस्या निर्माण झाली. कारण, एका आदेशात या प्रकरणाचा तपास थांबविण्यात आला, तर दुसºया प्रकरणात तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. कायदेशीर समस्येत अडकलेले हे प्रकरण २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात महिलेने आपल्या भावांविरुद्ध २००४ मध्ये तक्रार देत म्हटले होते की, भावांनी आपले दुकान बळकाविले आहे. मात्र, या प्रकरणात असे दाखविण्यात आले की, या महिलेने दुकान आपल्या भावांना भाड्याने दिले आहे. न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या पीठाने म्हटले आहे की, हा खटला सुरू होण्यास वेळ झाल्याबाबत आम्हाला खेद आहे.