अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:06 PM2024-05-08T18:06:11+5:302024-05-08T18:18:18+5:30

Arvind Kejriwal : न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी सुरू आहे.

Supreme Court says it may pass interim order on Arvind Kejriwal's bail on May 10 | अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 

अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 

Arvind Kejriwal Bail : नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी आदेश येऊ शकतो. आज म्हणजेच बुधवारच्या कामकाजानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी ईडीच्या वकिलाला सांगितले की, या प्रकरणाबाबत शुक्रवारी आदेश दिला जाऊ शकतो.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला, तर या कालावधीत ते त्यांच्या कार्यालयात जाणार नाहीत. यावर, अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा हवाला देऊन सांगितले होते की, या कालावधीत ते कार्यालयात जाणार नाहीत.

या कालावधीत अरविंद केजरीवाल कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी करणार नसल्याचे अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले होते. त्यासाठी एक अट ठेवत अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हणाले होते की, या काळात मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी नसल्यास दिल्लीच्या उपराज्यपालांनी फायली परत पाठवू नयेत. तसेच,  जामिनावर असताना त्यांनी आपली अधिकृत कर्तव्ये पार पाडली तर त्याचे व्यापक परिणाम होऊ शकतात आणि हितसंबंधांच्या संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

दरम्यान, ईडीच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात युक्तीवाद केला होता. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांच्यावरील कोणत्याही उदारतेला विरोध केला. तसेच, असे केले तर राजकारण्यांसाठी वेगळा कायदा पाळल्यासारखे होईल, असे तुषार मेहता म्हणाले. याशिवाय, शेतकरी आणि दुकान मालकाचे उदाहरण देत तुषार मेहता म्हणाले की, कापणीच्या वेळी शेतकऱ्याने जामीन मागितला तर त्यालाही जामीन मिळेल का?

अरविंद केजरीवालांना कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आलीय?
आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर दिल्ली मद्य धोरणाद्वारे काही लोकांना फायदा मिळवून देण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नावाचा समावेश आहे. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

Web Title: Supreme Court says it may pass interim order on Arvind Kejriwal's bail on May 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.