ऑक्सिजनच्या बाबतीत टास्क फोर्सनं केलेल्या शिफारसींचं काय झालं? सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 03:32 PM2021-08-09T15:32:46+5:302021-08-09T15:33:19+5:30
Covid 19: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजन पुरविण्यासंदर्भात एक टाक्स फोर्सची स्थापना कोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आली होती.
Covid 19: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजन पुरविण्यासंदर्भात एक टाक्स फोर्सची स्थापना कोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आली होती. या टास्क फोर्सनं केलेल्या शिफारसींवर कोणती पावलं उचलली गेली याचा अहवाल दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं आज केंद्र सरकारला दिले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा आणि ऑडिटबाबत राष्ट्रीय टास्क फोर्सनं अंतिम अहवाल सरकारकडे सुपूर्त केला आहे अशी माहिती केंद्रानं कोर्टात दिली आहे. (Supreme Court seeks Centre's action taken report on recommendations of National Task Force on Oxygen)
टास्क फोर्समध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश केला आहे. त्यामुळे या समितीनं सुचविलेल्या शिफारसींवर केंद्र सरकार ठोस पावलं उचलून काम करेल अशी आम्हाला आशा आहे, असं कोर्टानं म्हटलं आहे. टास्क फोर्सनं सादर केलाला अहवाल आणि त्यावर केंद्रानं केलेल्या उपाययोजना यांचा संयुक्त अहवाल येत्या दोन आठवड्यांच्या आत सुप्रीम कोर्टासमोर सादर करावा लागणार आहे.
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि एमआर शाह यांच्या खंडपीठानं यावरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे. प्रत्येक राज्यांच्या सरकारांना त्यांच्या राज्यातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत एक टास्क फोर्सची स्थापना करण्याचे आदेश याआधीच देण्यात आले होते, असं केंद्र सरकारच्या वतीनं कोर्टात सांगण्यात आलं आहे.