कोलकाता केस: SCचे प. बंगाल सरकारवर ताशेरे, प्रश्नांची सरबत्ती; १० प्रमुख मुद्दे केले उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 03:39 PM2024-08-20T15:39:26+5:302024-08-20T15:40:07+5:30
Supreme Court Slams West Bengal Govt over Kolkata Case: कोलकाता प्रकरणी स्वतःहून दखल घेत सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली. यावेळी पश्चिम बंगाल सरकारला फटकारताना कोर्टाने आंदोलक डॉक्टरांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
Supreme Court Slams West Bengal Govt over Kolkata Case: कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर गळा दाबून हत्या करण्यात आली, असा तिच्या शवविच्छेदन अहवालाचा निष्कर्ष आहे. तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत असून, दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. यातच सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत विशेष सुनावणी घेतली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानेपश्चिम बंगाल सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. तसेच महत्त्वाचे अनेक प्रश्न उपस्थित करत त्याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली. या प्रकरणातील अनेक मुद्द्यांवर महत्त्वाचे निरीक्षण नोंदवून चिंताही व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली. शांतताप्रिय आंदोलकांवर सत्ता गाजवू नका. आपण त्यांच्याशी अत्यंत संवेदनशीलतेने वागू या, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला केले आहे. तसेच काही पावले उचलण्यासाठी देश दुसऱ्या अशाच प्रकारच्या घटनेची वाट पाहू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी नेमके काय म्हटलेय?
- आम्ही या प्रकरणाची दखल घेतली कारण या प्रकरणावर एक राष्ट्रीय स्तरावर सार्वमत बनवण्याची आवश्यकता आहे.
- महिला नोकरीच्या ठिकाणी जाऊ शकणार नसेल तर घटनात्मक समानतेला अर्थ काय आहे?
- डॉक्टरची हत्या झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले. रात्री उशिरा एफआयआर नोंदवण्यात आला. तीन तास रुग्णालयातील अधिकारी काय करत होते?
- गुन्हा दाखल करण्यास इतका उशिरा का झाला? अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली?
- पीडिताच्या आई वडिलांना उशिरा मृतदेह देण्यात का आला? आणि त्याच रात्री हॉस्पिटलवर मॉबने हल्ला केला?
- रुग्णालयावर जमावाने आक्रमण केले. गंभीर सुविधांचे नुकसान झाले. यावेळी पोलिस काय करत होते?
- पोलिस काय करत होते? क्राइम सीन सुरक्षित ठेवणे हे पोलिसांचे काम नाही का?
- आम्ही डॉक्टरांना काम पुन्हा सुरू करण्याची विनंती करतो. जर रुग्णांनी आपला जीव गमावला तर?
- आम्ही एक राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन करत आहोत ज्यामध्ये विविध पार्श्वभूमीचे डॉक्टर असतील. संपूर्ण देशात अनुसरण करण्याच्या पद्धती सुचवतील. कामाच्या सुरक्षिततेची परिस्थिती असेल आणि तरुण किंवा मध्यमवयीन डॉक्टर त्यांच्या कामाच्या वातावरणात सुरक्षित असतील.