आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय शिक्षणासाठी आरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 11:36 AM2019-05-30T11:36:52+5:302019-05-30T11:38:32+5:30
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याबाबत घटना दुरुस्ती केली होती.
नवी दिल्ली : देशातील आरक्षण नसलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारने गेल्या फेब्रुवारीमध्ये निर्णय घेतला होता. यावर महाराष्ट्र सरकारने केलेल्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याबाबत घटना दुरुस्ती केली होती. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या निर्णयामुळे ज्याचे उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा खुला प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळणार होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या जागांवर स्थगिती आणली आहे.
Supreme Court stays Maharashtra Government's order on 10% reservation to the Economically Weaker Section (EWS) category students in PG medical admissions this year in the state. pic.twitter.com/hMjeDgLyoF
— ANI (@ANI) May 30, 2019
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समाजात सन्मानाने जगता यावे आणि त्यांना शिक्षण आणि नोकरीची संधी प्राप्त व्हावी, यासाठी या घटकाला १० टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच घटना दुरुस्ती केली आहे. केंद्र सरकारच्या याच निर्णयाप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामुळे केंद्र सरकारचा निर्णयही वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू न करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हाच निर्णय कायम ठेवला होता. या निर्णयाविरोधात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला होता.