ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने! २ याचिका सुप्रीम कोर्ट ऐकणार; सोमवारी सुनावणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 10:00 AM2023-09-16T10:00:38+5:302023-09-16T10:02:57+5:30
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: सुप्रीम कोर्टात शिवसेना शिंदे गटाविरोधात ठाकरे गटाने केलेल्या दोन महत्त्वाच्या याचिकांवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत अद्यापही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामध्ये विविध याचिकांची भर पडल्याचेही पाहायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने उभे ठाकणार असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाच्या दोन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांना नोटीस बजावली होती. यावर आता सुनावणी सुरू होत आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या नोटिशीला ठाकरे गटाच्या आमदारांनी वकिलांमार्फत वैयक्तिकरित्या ५०० पानी लेखी उत्तर दाखल केले होते. तर, शिंदे गटाकडून ६००० पानी खुलासा सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे.
कोणत्या दोन याचिकांवर होणार सुनावणी?
शिवसेनेतून फुटून निघालेल्या १६ आमदारांची अपात्रता याचिका, शिवसेना पक्ष नाव आणि पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकांवर येत्या सोमवारी, १८ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या सुनावणीकडे शिंदे-ठाकरे गटासह संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे. खंडपीठाने ३१ जुलै रोजी सुनावणी करण्याचे यापूर्वी ठरविले होते.
दरम्यान, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन गट तयार झाले. पक्षातील दोन गटांमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात ६ ऑक्टोबरला महत्त्वाची सुनावणी होण्याची शक्यता असून, दोन्ही गटांना ६ ऑक्टोबरला हजर राहण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.