नवनीत राणांना मोठा दिलासा! खासदारकी राहणार, सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 02:40 PM2021-06-22T14:40:40+5:302021-06-22T14:41:22+5:30
अमरावती मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे.
अमरावती मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या खासदारकीवर येणारं संकट तुर्तास टळलं आहे.
मुंबई हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र फेटाळून लावत दोन लाखांचा दंड ठोठावला होता. त्यासोबतच सहा आठवड्यात जातीचा दाखला व जातवैधता प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले होते. नवनीत रवी राणा यांनी फसवणूक करून व बनावट कागदपत्रे सादर करून जात प्रमाणपत्र मिळवले आहे, असा ठपका न्यायालयाने ठेवला होता. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं आज हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यासंबंधिचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
Supreme Court today stayed the order of Bombay High Court that had cancelled the caste certificate of Navneet Kaur Rana, who is an independent Member of Parliament (MP) from Amravati in Maharashtra.
— ANI (@ANI) June 22, 2021
(File photo) pic.twitter.com/vPz2gM6lXQ
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राणा उमेदवार होत्या. २०१९ मध्ये शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव करीत त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या. अडसूळ यांनी राणा यांच्या निवडणुकीला रिट याचिकेद्वारे २०१८ मध्येच आव्हान दिले होते. राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘मोची’ असल्याचे दाखवून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुसूचित जातीचा दाखला मिळवला आणि मुंबई उपनगर जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता समितीने ३ नोव्हेंबर २०१७ रोजी ते प्रमाणपत्र वैध ठरवले, असा अडसूळ यांचा आरोप होता. खंडपीठाने या याचिकेवरील निकाल ९ एप्रिल २०२१ रोजी राखून ठेवला होता.