सर्वाेच्च न्यायालयाने गोविंदाला सुनावले
By admin | Published: February 10, 2016 01:01 AM2016-02-10T01:01:51+5:302016-02-10T01:01:51+5:30
केलेल्या कृत्याची खरोखरीच मनापासून खंत वाटत असेल, तर तुम्ही ज्याच्या श्रीमुखात लागवली होती, त्याला प्रत्यक्ष भेटून त्याची माफी मागा व त्याबद्दल काही भरपाई द्यायची असेल, तर तीही
नवी दिल्ली: केलेल्या कृत्याची खरोखरीच मनापासून खंत वाटत असेल, तर तुम्ही ज्याच्या श्रीमुखात लागवली होती, त्याला प्रत्यक्ष भेटून त्याची माफी मागा व त्याबद्दल काही भरपाई द्यायची असेल, तर तीही त्याच्याच हाती सोपवा, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता गोविंदाला प्रायश्चित्तासाठी मंगळवारी शेवटची संधी दिली.
मंगळवारी हे अपील पुढील सुनावणीसाठी न्या. व्ही. गोपाळ गौडा व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठापुढे आले, तेव्हा गोविंदाच्या वकील संगीता कुमार यांनी तडजोडीचा मसुदा सादर केला. त्यात राय यांची लेखी माफी मागण्याची व त्यांना पाच लाख रुपये भरपाई देण्यास गोविंदा तयार असल्याचे नमूद केले गेले होते. हा मसुदा पाहिल्यावर न्यायाधीश गोविंदाच्या वकिलांना म्हणाले, ‘गेल्या तारखेला आम्ही तुम्हाला काय सांगितले होते? (ज्याच्या श्रीमुखात लगावली) त्याला प्रत्यक्ष भेटून प्रकरण मिटवा. तुम्हाला जे काही सांगायचे व द्यायचे आहे, ते त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगा. तडजोडीचा प्रस्ताव आमच्याकडे देऊ नका!’
मूळ फिर्यादी राय यांचे वकील जतिन झवेरी यांनी असा आरोप केला की, गोविंदाने राय यांना प्रत्यक्ष भेटण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. ते आपले वकील किंवा स्वीय सचिवाच्या माध्यमातूनच तडजोडीची भाषा करीत आहेत. ६ फेब्रुवारी रोजी गोविंदा राय यांना भेटेल, असे सांगितले गेले, पण तो आला नाही.
मात्र, गोविंदाच्या वर्तनाचे समर्थन करण्याचा प्रयत्न संगीता कुमारनी केला. न्यायाधीशांना त्या म्हणाल्या, ‘तो स्वत: न्यायालयात येऊनही माफी मागायला तयार आहे.’ यावर न्यायाधीशांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, न्यायालयात न येता, फिर्यादीला प्रत्यक्ष भेटून प्रकरण कसे संपवायचे ते पाहावे. यासाठी गोविंदाला दोन आठवड्यांची वेळ दिली व त्यातून काही निष्पन्न झाले नाही, तर राय यांच्या अपिलाचा गुणवत्तेवर निर्णय केला जाईल, असेही स्पष्ट केले.
राय यांचे अपील मंजूर झाले, तर गोविंदाविरुद्ध धाकदपटशा करणे व मारहाण करणे, या गुन्ह्यांसाठी खटला चालेल व त्यात दोषी ठरला, तर त्यास दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
या आधी ३० नोव्हेंबर रोजी न्या. टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली, तेव्हा आम्हीही तुमचे चित्रपट आवडीने पाहतो, असे सांगून न्यायाधीश गोविंदाला म्हणाले होते, ‘तुम्ही मोठे कलावंत आहात. झालेली चूक तुम्ही मोठ्या मनाने कबूल करायाल हवी. फिर्यादीची माफी मागून त्यांच्याकडे तुम्ही क्षमायाचना करायला हवी. हे प्रकरण दीर्घकाळ लांबवत ठेवण्यापेक्षा चूक कबूल करून ते लवकर मिटवा.’
२००८ मध्ये मुंबईत चत्रपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतील संतोष राय या चाहत्याच्या गोविंदाने श्रीमुखात लगावली होती. त्या वेळी गोविंदा खासदारही होता. यावरून राय यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून गोविंदाविरुद्ध फौजदारी खटला चालविण्याचे समन्स महानगर दंडाधिकाऱ्यांनी काढले होते, परंतु गोविंदाचे अपील मान्य करून मुंबई उच्च न्यायालयाने राय यांची मूळ फिर्यादच रद्द केली. याविरुद्ध राय यांचे अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, त्यात तडजोडीने प्रकरण मिटविता आल्यास पाहावे, असे न्यायालयाने सूचविले होते व गोविंदाने माफी मागण्याची तयारी दर्शविली.