गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि याहूला सर्वोच्च न्यायालयाची चपराक
By admin | Published: February 16, 2017 04:36 PM2017-02-16T16:36:54+5:302017-02-16T16:36:54+5:30
जगातल्या सर्वात मोठ्या आणि नावाजलेल्या कंपन्या गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि याहूला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - जगातल्या सर्वात मोठ्या आणि नावाजलेल्या कंपन्या गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि याहूला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे. या तिन्ही सर्च इंजिनमध्ये अग्रेसर असलेल्या कंपन्यांनी भारतीय कायद्याचे नियम पायदळी तुडवून गर्भलिंग निदानासंबंधित जाहिराती दाखवणे सर्रास सुरूच ठेवलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं या कंपन्यांवर कारवाई केली आहे. लिंग निदानाशी संबंधित असलेला मजकूर बॅन करण्यासाठी कंपन्यांना एक इंटर्नल एक्सपर्ट पॅनल बनवण्याचेही निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
तुम्ही इतर देशांच्या कायद्याचं पालन करता. त्यामुळे भारताच्या कायद्याचा तुम्ही भंग करू शकत नाही. तुम्ही भारतीय कायद्याचं जबाबदारीनं पालन केलं पाहिजे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. गर्भलिंग निदानासंबंधित जाहिराती दाखवत असल्याकारणाने सर्वोच्च न्यायालयात या तीन कंपन्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयानं या तिन्ही कंपन्यांना धारेवर धरलं आहे. या कंपन्यांच्या वकिलांनीही भारतीय कायद्याचं उल्लंघन करणार नसल्याचं न्यायालयाला आश्वासन दिलं आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोडल एजन्सीबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचाही सल्ला दिला आहे. जेणेकरून लिंग परीक्षणासंबंधित जाहिरात दाखवल्यास लोक नोडल एजन्सीशी संपर्क साधतील. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 एप्रिलला होणार आहे.