तलाकच्या कायदेशीर बाजूंवरच विचार करणार : सर्वोच्च न्यायालय
By admin | Published: February 15, 2017 12:18 AM2017-02-15T00:18:02+5:302017-02-15T00:18:02+5:30
मुस्लिमांमधील तीन वेळा तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या प्रथेच्या केवळ कायदेशीर बाजूंशीच संबंधित प्रश्नावर आम्ही निर्णय घेऊ
नवी दिल्ली : मुस्लिमांमधील तीन वेळा तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या प्रथेच्या केवळ कायदेशीर बाजूंशीच संबंधित प्रश्नावर आम्ही निर्णय घेऊ आणि इस्लामी कायद्याखाली होणाऱ्या तलाकवर न्यायालयाने देखरेख ठेवण्याची गरज आहे का या प्रश्नाचा आम्ही विचार करणार नाही, कारण तो विषय विधिमंडळाच्या कक्षेतील आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले.
तुम्ही (वादी आणि प्रतिवादींचे वकील) एकत्र बसून आमच्याकडून कोणत्या मुद्द्यांवर विचार व्हावा याचा निर्णय घ्यावा. निर्णय घेण्यासाठी ते आम्ही १६ फेब्रुवारी रोजीच्या यादीत समाविष्ट करीत आहोत, असे सरन्यायाधीश जे. एस. खेहार, न्या. एन. व्ही. रामणा आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले.
एखाद्या विशिष्ट प्रकरणाच्या वस्तुस्थितीच्या बाजूंचा आम्ही विचार करणार नाही. प्रश्नाची कायदेशीर बाजू विचारात घेऊ, असे खंडपीठाने संबंधित पक्षांना स्पष्ट केले.
प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे यात आम्हाला काही स्वारस्य नाही तर आम्हाला फक्त त्याच्या कायदेशीर बाजुंचाच विचार करायचा आहे, असे खंडपीठाने म्हटले.