सर्वोच्च न्यायालयाचे सलग १० तास काम; ७५ खटल्यांची करण्यात आली सुनावणी; विविध याचिका निकाली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 10:36 AM2022-10-02T10:36:30+5:302022-10-02T10:37:34+5:30
न्यायालयाच्या नियमित वेळेपेक्षा अधिक तास या खंडपीठाने काम केले.
नवी दिल्ली:सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने शुक्रवारी रात्री ९.१० वाजेपर्यंत विविध याचिकांची सुनावणी घेतली. या खंडपीठाने त्यादिवशी १० तास ४० मिनिटे सुनावणीचे काम केले. त्यामध्ये ७५ खटल्यांचा निपटारा करण्यात आला. न्यायालयाच्या नियमित वेळेपेक्षा अधिक तास या खंडपीठाने काम केले.
सर्वोच्च न्यायालयाची कामकाजाची वेळ सकाळी साडेदहा ते संध्याकाळी चार इतकी असते. पुढील आठवड्यात दसऱ्याच्या सुट्टीनिमित्त न्यायालयाचे कामकाज बंद राहील. त्यामुळे न्या. चंद्रचूड व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने शुक्रवारी दहा तासांहून अधिक काळ सुनावणीचे काम केले. रात्री नऊ वाजेपर्यंत सुनावणी सुरू ठेवण्याच्या निर्णयाला वकील व कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला. सुनावणी संपताच खंडपीठाने वकील व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. (वृत्तसंस्था)
या दोन कारणांसाठीच पुढे ढकलणार सुनावणी
शुक्रवारसाठी सूचिबद्ध करण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती एका वकिलाने केली होती. त्यावर न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सांगितले की, याचिका सुनावणीसाठी सूचिबद्ध होत नाहीत, अशी तक्रार वकील करतात. मात्र, जेव्हा प्रकरण न्यायालयासमोर येते तेव्हा वकील सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करतात. सुनावणीची तारीख कोरोना साथ किंवा एखाद्याच्या मृत्यूची घटना या दोन कारणांमुळेच पुढे ढकलली जाऊ शकते, असे खंडपीठाने म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"