वाढदिवशीच होणार याकूबला फाशी, सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
By admin | Published: July 21, 2015 02:56 PM2015-07-21T14:56:14+5:302015-07-21T15:24:06+5:30
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमनची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून त्याला त्याच्या वाढदिवशीच (३० जुलै) फाशी देण्यात येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमनची फेरविचार ( क्युरेटिव्ह) याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले असून त्याला त्याच्या वाढदिवशीच (३० जुलै) फाशी देण्यात येणार आहे.
मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बाँबस्फोटप्रकरणात दोषी ठरलेल्या याकूब अब्दुल रझाक मेमनला टाडा कोर्टाने २००७ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. ल्या मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर एप्रिलमध्ये राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने टाडा कोर्टाची परवानगी घेऊन त्याला फाशी देण्यासाठीची आवश्यक प्रक्रिया सुरू केली होती. मात्र गळ्याभोवती आवळला जाणारा फास टाळण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेतील शेवटचा प्रयत्न म्हणून याकूबने सर्वोच्च न्यायालयात 'क्युरेटिव्ह पीटिशन' केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही पीटिशन फेटाळून लावत याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार येत्या ३० जुलै रोजी याकूबला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणा-या सर्वसामान्य नागरिकांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावणारे टाडा कोर्टाचे माजी न्यायाधीश पी. डी. कोडे यांनी दिली आहे.
याकूबने स्वत:च्या बचावासाठी अथक प्रयत्न केले, मात्र अखेर सत्याचा आणि न्यायाचाच विजय झाला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक असून कोर्टाच्या निर्णयाने चांगला संदेश मिळाला आहे, असे मत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मांडले.