'मनमोहनसिंगांप्रमाणे कर्जमाफी द्या', तातडीच्या मुद्द्यांतर्गत सुप्रिया सुळेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 12:20 PM2019-11-19T12:20:26+5:302019-11-19T12:23:29+5:30
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय
मुंबई - बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळेंनीलोकसभा अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न अतिमहत्त्वाच्या अनुषंगाने उपस्थित केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून लोकसभा सभागृहात महाराष्ट्रातील खासदारांनी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचा मुद्दा प्रामुख्याने घेतला. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शिवसेनेनं घोषणाबाजी केली.
अमरावती मतदारसंघातील खासदार नवनीत राणा कौर यांनी शिवसेनेला लक्ष्य करत, शेतकऱ्यांसाठी मी माझं घरही जाळायला तयार असल्याचं म्हटलं. तसेच, 50 हजार कोटींची मागणीही केंद्र सरकारकडे केली आहे. त्यानंतर, सुप्रिया सुळेंनीही शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी लोकसभेतील भाषणात केली.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय. या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. याच भूमिकेचा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुप्रिया यांनी पुनरुच्चार केला. युपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी व कर्जांचे पुनर्गठण करण्याची गरज असल्याचं सुप्रिया यांनी म्हटलं. लोकहिताचे तातडीने मुद्दे (नियम 377) अंतर्गत बोलताना सुप्रिया यांनी सभागृहात आपली मागणी लावून धरली.
युपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती.त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी व कर्जांचे पुनर्गठण करण्याची गरज असल्याची मागणी लोकहिताचे तातडीने मुद्दे (नियम ३७७) अंतर्गत बोलताना सभागृहात केली.
— Supriya Sule (@supriya_sule) November 18, 2019