महाराष्ट्राच्या चित्ररथास परवानगी नाकारल्याने सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 04:01 PM2020-01-02T16:01:55+5:302020-01-02T16:02:28+5:30
महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. दरम्यान, महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रजासत्ताक दिन हा देशाचा उत्सव असून, केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याचे माहिती समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी याविरोधात ट्विटरवरून संताप व्यक्त केला आहे. ''महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे.या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे.केंद्र सरकारच्या या कृतीचा मी जाहीर निषेध करत आहे,'' असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
.@PMOIndia महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे.या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे.केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध.(2/2)https://t.co/Q90raJSZW3
— Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2020
'''प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून. विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय.'' असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली.हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे.परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय.
— Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2020
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथांनी नेहमीच छाप पाडली आहे. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. मात्र नंतर महाराष्ट्राचा या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये 'शिवराज्याभिषेक' या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1983 मध्ये बैळपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल आला होता. पुढे 1993/94/95 अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी राजपथावरील संचलनात बाजी मारली होती. 2015 मध्ये पंढरीची वारी ह्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. तर 2018 मध्ये महाराष्ट्राने सादर केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने अव्वल स्थान पटकावले होते.