Sur Jyotsna National Music Awards : दिल्लीत आज 'सूर ज्योत्स्ना' राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण सोहळा; संगीतसाधकांचा होणार विशेष सत्कार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 15:50 IST2021-12-23T15:42:16+5:302021-12-23T15:50:29+5:30
Sur Jyotsna National Music Awards : या वितरण पुरस्कार सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर असणार आहे.

Sur Jyotsna National Music Awards : दिल्लीत आज 'सूर ज्योत्स्ना' राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण सोहळा; संगीतसाधकांचा होणार विशेष सत्कार!
नवी दिल्ली : लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या 'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०२१' चे वितरण आज होणार आहे. दिल्लीतील मंडी हाउस येथील कमानी ऑडिटोरियममध्ये या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता होईल. तसेच, या वितरण पुरस्कार सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर असणार आहे.
संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभावंतांच्या सन्मान सोहळ्याचे हे आठवे वर्ष आहे. सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याने युवास्थेतच भारतीय संगीत रसिकांवर आपली जादू चालविणारी मैथिली ठाकूर व लिडियन नादस्वरम हे 'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०२१' चे विजेते ठरले आहेत. तसेच, यंदाच्या या आठव्या पर्वात आघाडीचे सरोदवादक बंगश बंधू अमान अली व अयान अली यांचे ‘लाइव्ह कन्सर्ट’ विशेष आकर्षण राहणार आहे. तर या पुरस्कार सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून पद्मविभूषण अमजद अली खान व शुभलक्ष्मी बरुआ खान उपस्थित असणार आहेत.
देशभरातील संगीत प्रतिभावंतांना शोधून त्यांना प्रोत्साहित करणे हा या पुरस्काराचा मूळ उद्देश असून, मागच्या सात वर्षात या मंचने अनेक कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भावी वाटचालीकरिता प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे. लोकमत 'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार' हा असा मंच आहे, ज्याने अनेक नवीन संगीतकारांची देशाला ओळख करून देण्यासोबतच संगीताचे क्षेत्र विस्तारण्यात मोलाचे योगदान दिले आहे. मागच्या सात वर्षात या पुरस्काराने अवघ्या देशात स्वत:ची एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे.
पद्मविभूषण, पद्मभूषण प्राप्त संगीतसाधकांचा विशेष सत्कार
या पुरस्कार सोहळ्यात पद्मविभूषण अमजद अली खान व शुभलक्ष्मी बरुआ खान, पद्मभूषण पं. विश्वमोहन भट, ग्वाल्हेर घराण्याचे पं. लक्ष्मण कृष्णराव पंडित, प्रख्यात शास्त्रीय गायक पं. साजन मिश्रा, पद्मभूषण राजीव सेठी यांचा विशेष सत्कार होईल. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर, तर केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नकवी, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री डॉ. महेंद्रकुमार पांडेय, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व खासदार फारुख अब्दुल्ला विशेष पाहुणे असतील. याशिवाय विविध राज्यांचे काही खासदारही उपस्थित राहणार आहेत.
या मान्यवरांनी केली विजेत्यांची निवड
पद्मश्री आनंदजी वीरजी शहा (कल्याणजी-आनंदजी), पद्मश्री पंकज उदास, प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, गायिका सोनाली राठोड, शशी व्यासजी, गौरी यादवडकर, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी यंदाच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.
मैथिली ठाकूर
मैथिलीचा जन्म प्रसिद्ध संगीतकार रमेश व भारती ठाकूर या दाम्पत्याच्या घरी २५ जुलै २००० रोजी बिहार येथील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपत्ती येथे झाला. तिला संगीताचा वारसा पिढिजात लाभला आहे. तिचे दोन्ही लहान भाऊ रिशव आणि अयाची गायन आणि तबलावादनात पुढे येत आहेत. मैथिलीला संगीताचे प्राथमिक धडे वडिलांकडूनच प्राप्त झाले. संगीताबाबत असलेली तिची ओढ बघून वडिलांनी पुढच्या शिक्षणासाठी नवी दिल्ली येथील द्वारकानगर येथे आणले. ती वडिलांकडूनच शास्त्रीय संगीत, संवादिनी, तबला या विद्यांमध्ये पारंगत्व प्राप्त केले. २०११ मध्ये तिने झी टीव्हीवरील सारेगमप लिटल चॅम्प्स या रिॲलिटी शोद्वारे दूरचित्रवाणीवर पदार्पण केले. चार वर्षाने ती पुन्हा सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉल ज्युनिअरमध्ये सहभागी झाली. मात्र, तिला ओळख मिळाली ती रायजिंग स्टार या रिॲलिटी शोमधून. या रिॲलिटी शोमध्ये ती उपविजेती ठरली. यातील तिने गायलेल्या अतिशय ताकदीच्या ‘ओम नम: शिवाय’ या गीताने आणि तिने दिलेल्या असामान्य अशा स्वरांनी ती संगीत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली. ती तामीळ, तेलुगू, भोजपुरी, मराठी आणि हिंदी या भाषांतील गाणी गाते. बॉलिवूड साँग्जसोबतच ती पारंपरिक लोकसंगीतही सादर करते. २०१५मध्ये मैथिलीने ‘गाय जिनियस यंग सिंगिंग स्टार’ ही भारतीय संगीत स्पर्धा जिंकली आहे. तिचा ‘या रब्बा’ हा म्युझिक अल्बमही प्रदर्शित झाला आहे. निवडणूक आयोगाने २०१९ मध्ये तिला आणि तिच्या दोन्ही बंधूंना मधुबनी जिल्ह्याचे ब्रॅण्ड ॲम्बेसडर म्हणून घोषित केले आहे. मैथिली केवळ २० वर्षांची असून, संगीत क्षेत्रातील तिच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे ती आज जगभरात ओळखली जाते.
लिडियन नादस्वरम
लिडियनचा जन्म वर्षन सतीश व झाशी या दाम्पत्यांच्या पोटी ६ सप्टेंबर २००५ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. लिडियन हा या दाम्पत्याचे दुसरे अपत्य आहे. तो दोन वर्षांचा असताना त्याने ड्रम वाजविण्यास सुरुवात केली आणि आठ वर्षांचा असताना त्याने पियानोवादक म्हणून शिकण्यास सुरुवात केली. तो सेंच्युरी ओल्ड मद्रास म्युझिकल असोसिएशनचे संगीत दिग्दर्शक ऑगस्टिन पॉल यांचा विद्यार्थी आहे. २०१९मध्ये ‘दी सीबीएस वर्ल्डस बेस्ट’ स्पर्धा सीझन वनमध्ये १८५ देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यात तो विजेता ठरला. ‘दी एलेन डिगेनेरेस शो ॲण्ड दी सिएम्पर निनोज’ या स्पॅनिश टीव्ही शोमध्ये सहभागी झालेला तो पहिला भारतीय संगीतकार ठरला आहे. २०१३मध्ये लिडियनला ‘यंगेस्ट बेस्ट ड्रमर इन इंडिया’ हा पुरस्कार प्राप्त झाला असून, त्याने डॉ. ए. आर. रहेमान्स केएम म्युझिक कन्डर्वेटरी, चेन्नई येथे डॉ. सुरोजित चॅटर्जी यांच्याकडे दोन वर्षे रशियन पियानो मेथडचे प्रशिक्षण घेतले. त्याने डाॅ. ऑगस्टिन पॉल यांच्या मार्गदर्शनात लंडन येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये पियानोची ८ ग्रेड परीक्षा पूर्ण केली. लिडियन याने ‘बारोज दी डी-गामाज ट्रेझर’ या ऐतिहासिक थ्रीडी सिनेमाचे संगीत कम्पोज केले आहे. या सिनेमात प्रसिद्ध अभिनेता मोहनलाल असून कथा जीजो पुन्नूसे यांची आहे. लिडियनने बॉलिवूड संगीतप्रधान ‘अटकन चटकन’ या बाल चित्रपटाद्वारे लीड ॲक्टर म्हणून पदार्पण केले आहे. लेखन व दिग्दर्शन शिव हरे यांचे असून, डॉ. ए. आर. रहेमान यांची निर्मिती आहे. हा सिनेमा झी ५ वर २०२० मध्ये प्रदर्शित झाला. यासाठी लिडियनला साउथ लंडन व जयपूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे. त्याने २० पेक्षा अधिक संगीतवाद्ये वाजविण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे.
अमान आणि अयान अली बंगश ठरतील आकर्षण
यंदाच्या या आठव्या सांगीतिक पर्वात भारतीय शास्त्रीय संगीतात सरोदवादनाचे बहुआयाम स्थापित करणारे अमान अली व अयान अली हे बंगश बंधू विशेष आकर्षण ठरणार आहेत. त्यांच्या सरोदवादनाचा आस्वाद उपस्थित रसिकांना घेता येणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांचे हे पुत्ररत्न होत. अमान आणि अयान हे दोघेही बहुतांश वेळी सोबतच सादरीकरण करतात. त्यांनी सारेगमप या शोमध्येही सहभाग घेतला होता. त्यांच्या जुगलबंदीचे अल्बमही प्रसिद्ध आहेत. त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.