Sur Jyotsna National Music Awards : धर्म व देशांच्या सीमांमध्ये संगीत बंदिस्त करता येत नाही - अनुराग ठाकूर; सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे शानदार वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 09:56 AM2021-12-27T09:56:14+5:302021-12-27T10:00:00+5:30
Sur Jyotsna National Music Awards : उदयोन्मुख गायिका मैथिली ठाकूर व युवा संगीतकार लिडियन नादस्वरम यांना २०२१ च्या आठव्या लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने एका शानदार सोहळ्यात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
नवी दिल्ली : संगीत व खेळाला धर्म व देशाच्या सीमांमध्ये बंदिस्त करता येत नसून कलावंत हे जगात देशाचे खरे राजदूत असतात, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी गुरुवारी येथे केले. दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये उदयोन्मुख गायिका मैथिली ठाकूर व युवा संगीतकार लिडियन नादस्वरम यांना २०२१ च्या आठव्या लोकमतसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने एका शानदार सोहळ्यात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
एक लाख रुपये रोख, गौरवचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, आचार्य लोकेश मुनीजी, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रख्यात सरोदवादक अमजद अली खान, पंडित साजन मिश्रा, प्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड व सोनाली राठोड, पद्मभूषण राजीव सेठी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी झालेल्या बहारदार सादरीकरणाने राजधानी नवी दिल्ली सप्तसुरांच्या लाटेवर ’स्वार’ झाली.
यावेळी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, कलावंतांना जात, धर्म, प्रांत, भाषा वगैरेचे कोणतेही बंधन नसते. संगीत व खेळाच्या क्षेत्रात जात व धर्म विचारला जात नाही. केवळ कौशल्याच्या भरवशावर जगात आपली वेगळी ओळख निर्माण करता येते. कोरोना काळातही लोकमत परिवाराने पुरस्काराची परंपरा कायम ठेवली, या कार्यक्रमाचे आयोजन केले, उदयोन्मुख कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभेचा शोध घेण्याचे काम लोकमतने केले, हे खरोखरच स्तुत्य आहे. यासाठी लोकमत परिवार अभिनंदनास पात्र असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला म्हणाले, संगीतामध्ये एक वेगळी, माणसाला जिवंत ठेवण्याची शक्ती आहे. कलेच्याप्रति लोकमत परिवाराची आस्था अभिनंदनीय आहे. संगीताने माणुसकी व सर्वधर्मसमभावाची पेरणी व्हावी व या देशात शांतता नांदावी, असे भावनिक आवाहन डॉ. फारुक अब्दुल्ला यांनी केले. यावेळी बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकमत परिवाराशी असलेल्या व लोकमतच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा म्हणाले, ज्योत्स्ना दर्डा एक संगीत साधक होत्या. संगीतामध्ये समाजात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे, यावर ज्योत्स्ना दर्डा यांचा विश्वास होता. सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत अवाॅर्ड देण्यामागे देशातील उदयोन्मुख कलावंतांना समोर आणण्याचे उद्दिष्ट आहे. यावर्षी राजधानी दिल्लीत हा समारोह होत आहे, याचा मला अधिक आनंद आहे. देशाच्या राजधानीत एखाद्या कलावंतांला सन्मान मिळतो, याची दखल देशात घेतली जाते, असेही विजय दर्डा यावेळी म्हणाले. संगीत साधक व लोकमत सखी मंचच्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला प्रारंभी पुष्पांजली अर्पण करण्यात आली. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.मांगलिक पठणाने कार्यक्रमाची सुरुवात जैन धर्मातील मांगलिक पठणाने झाली. प्रसिद्ध भजन गायक विनय बाफना यांनी मांगलिक पठण केले. दोन्ही विजेत्यांना सन्मानित करण्यापूर्वी त्यांच्या गायन व वादनाचा आस्वाद श्रोत्यांनी घेतला. मैथिली ठाकूर हिने मराठी व इतर गीते सादर केली तर लिडीयन नादस्वरमच्या पियानो व ड्रम वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
जीवन की ज्योत्स्ना है
लोकमत सूर ज्योत्स्ना पुरस्कार २०२१ समारोहामध्ये ‘जीवन की ज्योत्स्ना है’ गीत विशेष आकर्षणाचे केंद्र होते. ज्योत्स्ना आणि जीवनातील ज्योत्स्ना यांचा संगम... गीतकार जावेद अख्तर यांच्या शब्दांची आणि गायक अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्या आवाजाची जादू अशी होती की, हे गाणे ऐकून प्रेक्षक भारावून गेले. जस्सीची इच्छा ‘दिल लगे कुडी गुजरात की’ या गीताने प्रसिद्धीस आलेले प्रसिद्ध गायक जसबीर जस्सी यांनी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने संगीताच्या क्षेत्रात एक वेगळे स्थान मिळविले असल्याची भावना व्यक्त केली. जसबीर जस्सीने या पुरस्काराच्या विजेत्यांची निवड करणाऱ्या ज्युरींमध्ये सामावून घेण्याची इच्छा लोकमत एडिटोरियल बोर्डचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्याकडे व्यक्त केली.
सर्वधर्मसमभावाचे व्यासपीठ
सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत समारोह हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक झाल्याचा अनुभव श्रोत्यांना यावेळी आला. व्यासपीठावर जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, खा. फारूक अब्दुल्ला होते. या समारोहासाठी प्रामुख्याने आचार्य लोकेश मुनीजींची पावन उपस्थिती होती. हा अपूर्व योगायोग साधून डॉ. फारूक अब्दुल्ला म्हणाले, व्यासपीठावर आचार्य लोकेश मुनीजी उपस्थित आहेत. विजेत्यांनी आचार्य लोकेश मुनीजींचे आशीर्वाद घ्यावे. दोन्ही विजेत्यांनी आचार्य लोकेश मुनीजींचे आशीर्वाद घेतले.
लोकमत डिजिटल अंकाची प्रतिकृती भेट
काही दिवसांपूर्वी अनुराग ठाकूर यांनी लोकमतच्या डिजिटल अंकाचे ऑनलाईन प्रकाशन केले होते. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी या समारोहात या ऐतिहासिक अंकाची प्रतिकृती माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांना प्रदान केली.
मैथिलीने गायिले ‘माझे माहेर पंढरी’
सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत अवाॅर्डची विजेती मैथिली ठाकूर हिने काही गीते यावेळी सादर केली. तिने सुरुवातीलाच ‘माझे माहेर पंढरी’ अभंग सादर केला. तेव्हा श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर करून मराठी गायनाला दाद दिली. नंतर तिने कानडा राजा पंढरीचा हा अभंगही गायला.
लिडियनने दिली देशभक्तीची प्रचिती
सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत अवाॅर्डचे विजेते युवा संगीतकार लिडियन नादस्वरमने पियानो वाजवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘जन गण मन’ राष्ट्रगीत पियोनोवर वाजविले. यावेळी सभागृहातील सारे श्रोते उभे राहिले.
अमान व अयान यांच्यासरोदवादनाने केले मंत्रमुग्ध
विख्यात सरोदवादक अमजद अली खान यांचे सुपुत्र अमान अली बंगश व अयान अली बंगश यांच्या सरोदवादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या दोन्ही भावंडांनी जवळपास अर्धा तास आपल्या जादुई सरोदवादनाने या संगीत मैफिलीत एक वेगळाच रंग भरला.
महनीयांचा गौरव
या कार्यक्रमात संगीताच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलेल्या महनीय कलावंतांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रख्यात सरोदवादक अमजद अली खान, पंडित साजन मिश्रा, लक्ष्मण कृष्णराव पंडित, पद्मभूषण राजीव सेठी यांना गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना शुभलक्ष्मी खान सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांचा सन्मान त्यांचे पती पद्मविभूषण अमजद अली खान यांनी स्वीकारला. तसेच ग्रँमी अवाॅर्ड विजेते व पद्मभूषण पंडित विश्वमोहन भट्ट प्रकृती अस्वस्थ्यामुळे सन्मान सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या घरी जाऊन हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे (आयएनएस) अध्यक्ष व टाइम्स ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक मोहित जैन, खासदार दिग्विजय सिंग, खासदार भुवनेश्वर कलिता, खासदार कृपाल तुमाने, खासदार देवेंद्रसिंग भोले, खासदार राजीव प्रताप रुडी, उद्योजक व माजी खासदार नवीन जिंदल, प्रसिद्ध उद्योजक मनोज जयस्वाल, ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक, ब्राईट आऊटडोअरचे व्यवस्थापकीय संचालक योगेश लखानी, अँक्शन फॉर मीडियाचे अनुराग बत्रा, हरीश भल्ला, पंडित शशी व्यास, तैवान कॉन्सुलेटमधील वरिष्ठ अधिकारी मुमीनचीन, सेवानिवृत्त केंद्रीय गृह सचिव व्ही. के. दुग्गल, हरयाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव आर. आर. जोएल, प्रा. डॉ. रंजू, ग्रामीण विभागाचे सचिव डॉ. एन. एन. सिन्हा, पी. के. उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष गुप्ता, गीतांजली बहल, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्यासह आयएएस, आयपीएस व आयआरएस कॅडरमधील अनेक सनदी अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, लोकमतच्या दिल्ली आवृत्तीचे प्रकाशक राकेश शर्मा व समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महनीय व्यक्तींनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. या शानदार सोहळ्याचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.