भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 04:23 PM2024-05-09T16:23:29+5:302024-05-09T16:24:46+5:30
Lok Sabha Election 2024 : भाजपाचे उमेदवार पुरुषोत्तम रुपाला यांनी राजपूत समाजाबाबत एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे संतप्त होऊन सूरज पाल अम्मू यांनी भाजपाला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Suraj Pal Ammu Resigns : लोकसभा निवडणुकीदरम्यान हरियाणामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. हरियाणा भाजपामधील राजपूत समाजाचे प्रमुख नेते सूरज पाल अम्मू यांनी पक्षाचा रामराम ठोकला आहे. भाजपाचे उमेदवार पुरुषोत्तम रुपाला यांनी राजपूत समाजाबाबत एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे संतप्त होऊन सूरज पाल अम्मू यांनी भाजपाला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
सूरज पाल अम्मू यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून आपल्या नाराजीचे कारण स्पष्ट केले आहे. राजीनामा पत्रात सूरज पाल अम्मू यांनी म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या उमेदवाराने क्षत्रिय समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना उमेदवारी दिल्याने आणि त्यांना संरक्षण दिल्याने मला दु:ख झाले आहे आणि याच दुःखी अंत:करणाने आज मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
याचबरोबर, पत्रात सूरज पाल अम्मू यांनी असेही लिहिले आहे की, "मी 34 वर्षे पक्षासाठी निस्वार्थपणे काम केले, तरीही मी कधीही तिकिटासाठी आकांक्षा बाळगली नाही, परंतु 2014 पासून राजकारणातील क्षत्रिय समाजाचे प्रतिनिधित्वही कमी झाले आहे. यामुळे प्रमुख नेत्यांनाही पक्षातून बाजूला केले जात आहे. तसेच, पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्यावेळी क्षत्रिय समाजाचा सन्मान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवर जबरदस्तीने गुन्हे दाखल करून हजारो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याची कारवाई भाजपशासित राज्यांमध्ये करण्यात आली, असेही सूरज पाल अम्मू यांनी म्हटले आहे.