जिंकलंस मित्रा! अपघातात एक हात, दोन्ही पाय गमावले पण हार मानली नाही, UPSCमध्ये मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 08:57 AM2023-05-24T08:57:00+5:302023-05-24T09:03:37+5:30
Suraj Tiwari : UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2022 मध्ये दोन्ही पाय, एक हात आणि दुसऱ्या हाताची दोन बोटे नसतानाही एका तरुणाने घवघवीत यश मिळवलं आहे.
कोणीतरी बरोबरच म्हटले आहे की जो मेहनत करतो त्याचा कधीच पराभव होत नाही. तुमची परिस्थिती कशीही असो, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची जिद्द तुमच्यात असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नाही. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. ज्याने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2022 मध्ये दोन्ही पाय, एक हात आणि दुसऱ्या हाताची दोन बोटे नसतानाही एका तरुणाने घवघवीत यश मिळवलं आहे.
मैनपुरी येथील रहिवासी असलेल्या सूरज तिवारीने नेत्रदिपक कामगिरी केली आहे. त्याचा एक भीषण अपघात झाला अन् क्षणात सर्व गोष्टी बदलल्या. खूप काही गमवावं लागलं, पण असं असताना देखील सूरजने जीवनात हार न मानता जीवनाशी लढण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे अपघातात सूरजला त्याचे दोन्ही पाय, एक हात आणि दुसऱ्या हाताची दोन बोटे गमवावी लागली होती.
सूरज तिवारीने 917 वा रँक मिळवला
सूरज या अपघातामुळे थोडा खचला पण त्याने हार मानली नाही. आज ही वाईट घटना विसरून त्याने देशातील सर्वात कठीण UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मंगळवारी, 23 मे रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल जाहीर केला, ज्यामध्ये सूरज तिवारीने 917 वा रँक मिळवला आहे.
इशिता किशोरने अव्वल स्थान पटकावले
UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 च्या अंतिम निकालात इशिता किशोरने अव्वल स्थान पटकावले आहे. तर, गरिमा लोहिया हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. याशिवाय तिसरे आणि चौथे स्थान अनुक्रमे उमा हराथी एन आणि स्मृती मिश्रा यांनी मिळविले आहे. यावर्षी टॉप 5 मध्ये चार रँक महिला उमेदवारांनी मिळवल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.