गुजरात: कोरोना बचावासाठी सरकारी रुग्णालयात यज्ञ; पण, अंतिम संस्काराची व्यवस्था अपुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 01:53 PM2021-04-14T13:53:22+5:302021-04-14T13:56:10+5:30
corona: गुजरातमध्ये कोरोना परिस्थिती गंभीर होत चालली असून, धक्कादायक विरोधाभास समोर आला आहे.
सूरत: देशात एकीकडे कोरोना (corona virus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना, त्यावर उपाय म्हणून लसीकरण, कडक निर्बंध, लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी अशा उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, गुजरातच्यासूरतमध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. सरकारी रुग्णालयात कोरोना बचावासाठी यज्ञ करण्यात आला होता. मात्र, गुजरातमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असून, मृताच्या अंतिम संस्कारासाठीही नातेवाइकांना वाट पाहावी लागत असल्याचा धक्कादायक विरोधाभास समोर आला आहे. (surat govt hospital organised yagya for corona but no arrangement for dead person)
देशभरात गेल्या २४ तासांत १ लाख ८४ हजार ३७२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे सूरतमधील सरकारी रुग्णालयात कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. आर्य समाजाने रुग्णालयात यज्ञ आयोजित केला होता. रुग्णलाय व्यवस्थापनाकडूनच यज्ञ करण्यास सांगितले होते, अशी माहिती आर्य समाजातील एका सदस्याकडून देण्यात आली.
गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा
रुग्णालयाचे डीनच झाले यजमान
आर्य समाजाचे अध्यक्ष उमाशंकर आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनाथ घेला आणि कुरुक्षेत्र स्मशानभूमीत यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. सूरतमधील सरकारी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनीच आम्हांला यज्ञाचे आयोजन करण्यास सांगितले होते, असे आर्य म्हणाले.
अंतिम संस्कारासाठी रांग
गुजरातमधील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, प्रत्येक तासाला ३ जणांना मृत्यू होत असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णांसाठी बेड्स, ऑक्सिजन यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा अंतिम संस्कारासाठीची व्यवस्थाही अपुरी पडत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत ६ हजार ६९० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून, अहमदाबादमध्ये २ हजार २५१, सूरतमध्ये एक हजार, तर राजकोटमध्ये ५२९ नवे कोरोना रुग्ण आढळले असून, अहमदाबाद येथे २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.