Suresh Gopi : काल शपथ घेतली, आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा; केरळच्या एकमेव भाजपा खासदारने सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 12:32 PM2024-06-10T12:32:12+5:302024-06-10T12:42:31+5:30

BJP Suresh Gopi And Lok Sabha Election Result 2024 : केरळमधील भाजपाचे पहिले खासदार सुरेश गोपी, ज्यांनी रविवारी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Suresh Gopi the first bjp mp from kerala who took oath likely to give up the ministerial post | Suresh Gopi : काल शपथ घेतली, आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा; केरळच्या एकमेव भाजपा खासदारने सांगितलं कारण

Suresh Gopi : काल शपथ घेतली, आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा; केरळच्या एकमेव भाजपा खासदारने सांगितलं कारण

केरळमधील भाजपाचे पहिले खासदार सुरेश गोपी, ज्यांनी रविवारी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र ते आता त्यांचं मंत्रिपद सोडण्याची शक्यता आहे. शपथविधी सोहळ्यानंतर दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना सुरेश गोपी म्हणाले की, त्यांनी मंत्रिपदाची मागणी केलेली नाही आणि लवकरच त्यांना या पदावरून मुक्त केलं जाईल अशी आशा आहे.

मंत्रिपद सोडण्यामागचं कारण सांगताना सुरेश गोपी म्हणाले की, "मी चित्रपट साइन केले आहेत आणि मला ते करायचे आहेत." सुरेश गोपी यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि केरळमधील भाजपाचे पहिले खासदार म्हणून इतिहासात आपलं नाव नोंदवलं. सुरेश यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) उमेदवार व्ही एस सुनीलकुमार यांचा ७४६८६ मतांनी पराभव केला.

"मला वाटतं की मला लवकरच पदावरून मुक्त केलं जाईल"

"खासदार म्हणून काम करण्याचं माझं ध्येय आहे. मी काहीही मागितलेलं नाही, मी म्हणालो होतो की, मला या पदाची गरज नाही. मला वाटतं की मला लवकरच पदावरून मुक्त केलं जाईल. त्रिशूरच्या मतदारांना कोणतीही अडचण नाही. त्यांना हे माहीत आहे आणि खासदार म्हणून मी त्यांच्यासाठी खरोखर चांगलं काम करेन. मला माझे चित्रपट कोणत्याही किंमतीत करायचे आहेत" असं सुरेश गोपी यांनी म्हटलं आहे. 

ज्या त्रिशूरमधून सुरेश गोपी विजयी झाले, ती जागा गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडे गेली होती. सुरेश गोपी लोकसभा खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी राज्यसभेचे खासदारही होते. २०१६ मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २०२२ पर्यंत होता.

चित्रपटांमध्ये साकारल्या महत्त्वाच्या भूमिका 

सुरेश गोपी मूळचा केरळमधील अलप्पुझा येथील आहे. त्यांचा जन्म 1958 मध्ये झाला. त्यांनी कोल्लममधून विज्ञान विषयात पदवी घेतली आणि इंग्रजीमध्ये मास्टर्स केलं. सुरेश चित्रपटांशीही संबंधित आहेत. त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. सुरेश गोपी यांनीही अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. १९९८ मध्ये आलेल्या कालियाट्टम या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच ते बराच काळ टीव्ही शो होस्ट करत आहेत. 
 

Web Title: Suresh Gopi the first bjp mp from kerala who took oath likely to give up the ministerial post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.