पंतप्रधान मोदींनी सुरेश प्रभूंचा राजीनामा ठेवला 'वेटींग'वर , म्हणाले 'थोडं थांबा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 08:19 PM2017-08-23T20:19:16+5:302017-08-23T20:23:49+5:30
सातत्याने होणा-या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'थोडं थांबा,' असं सांगत
नवी दिल्ली, दि. 23 - सातत्याने होणा-या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'थोडं थांबा,' असं सांगत अजूनपर्यंत प्रभू यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. स्वत: प्रभू यांनीच टि्वटरवरून ही माहिती दिली.
आज पहाटे उत्तर प्रदेशच्या औरेया येथे कैफियत एक्सप्रेसचे आठ डब्बे रेल्वे रूळावरून घसरले, त्यापूर्वी उत्कल एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला होता. आठवडयाभरात झालेल्या या दोन मोठ्या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपला राजीनामा सादर केला. दोन रेल्वे अपघातांमध्ये प्रवाशांचे प्राण गेले, अनेक प्रवासी जखमी झाले. त्यामुळे मला प्रचंड दु:ख, वेदना झाल्या असे ट्वीट प्रभूंनी केले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा देऊ केला. मात्र, पंतप्रधानांनी प्रभूंचा राजीनामा स्वीकारला नसल्यामुळे आणि वाट बघण्यास सांगितले असल्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
'मी पंतप्रधानांना आज भेटलो. या घटनेची संपूर्ण जबाबदारी घेत मोदींकडे राजीनामा सादर केला. पण त्यांनी मला थोडं थांबायला सांगितलं' असं टि्वट प्रभू यांनी केलं आहे.
प्रभूंच्या आधी भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी रेल्वेमंत्री असताना तामिळनाडूतील रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला होता. पण पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांचा राजीनामा फेटाळून लावला होता. तसेच आताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही देशाचे रेल्वेमंत्रीपद संभाळले आहे. त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.
I met the Hon'ble Prime Minister @narendramodi taking full moral responsibility. Hon’ble PM has asked me to wait. (5/5)
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) August 23, 2017